अवयव तोडणं आणि जोडणं
युद्धामध्ये अनेक सैनिकांचे हात पाय तुटत किंवा संसर्ग होऊन गँगरीन झाल्यामुळे तोडावे लागत असत. मग त्यांना दुसऱ्या जिवंत माणसांचे हात पाय जोडले जाऊ शकतात का अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी नाझी वैज्ञानिकांनी कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या लोकांचेही युद्धात तुटतात त्याप्रमाणे भूल न देता हात पाय तोडले होते. आणि एकाचे असे तोडलेले अवयव दुसऱ्याला बसवता येतात का हे ते अनेक ऑपरेशन्स करून पहात होते.
या प्रयोगात अनेक कैद्यांची हाडं, स्नायू आणि न्यूरॉन्सही तोडले होते. या कैद्यांचे प्रचंड हाल झाले. दिवसेंदिवस वेदनांनी विव्हळत असतानाही त्यांच्यावर अर्थातच काही उपचार झाले नाहीत. अर्थातच हे प्रयोग काही यशस्वी झाले नाहीत.
हे प्रयोग ज्या लोकांवर झाले होते त्यापैकी जडविगा कमिन्स्का (Jadwiga Kaminska) हिनं १२ ऑगस्ट १९४६ या दिवशी आपल्यावर कसे प्रयोग झाले हे सांगितलं. – ‘‘माझ्या दोन्ही पायांवर मला न सांगता न कळवता ऑपरेशन्स झाली. ती कशासाठी झाली ? त्या ऑपरेशन्समधे काय केलं हे मला कधीही सांगितलं गेलं नाही. अर्थातच ही ऑपरेशन्स भूल न देता केली होती. त्यामुळे मला आतोनात वेदना झाल्या होत्या. यानंतर प्रत्येक वेळी मला सणकून ताप आला होता. या तापावर उपचार म्हणून मला काहीही उपचार मिळाले नाहीतच; पण मला ऑपरेशननंतरही अनेक दिवस दुर्लक्षित ठेवलं गेलं. त्या जखमांमधून पुढचे अनेक महिने पू आणि घाण येत होती. मला प्रचंड वेदना होत होत्या. आणि मला माझ्या पायांचा आकार कायमसाठी गमवावा लागला होता.’’
उंचीवरचे प्रयोग
नाझी डॉक्टर सिग्मंड रॅशर यानं तर एक भयंकर खुनशी प्रयोग करायचा घाट घातला होता. जर्मन वैमानिकांना विमानानं उंचावर उडावं लागायचं. त्या उंचीचा त्यांना त्रास व्हायचा. उंचीवर गेल्यामुळे शरीरामध्ये काय बदल होतात हे त्याला या प्रयोगामधून पहायचं होतं. त्यासाठी त्यानं आपल्या लुफ्तवॅफ मेडिकल सर्व्हिसेसच्या सहकाऱ्यांबरोबर जवळपास २०० लोकांवर डचाऊ कॉन्संट्रेशन कॅम्पमध्ये हा प्रयोग केला होता. जमिनीपसून उंच गेलं की हवेचा दाब कमी होतो आणि ऑक्सिजनही कमी होतो. जमिनीपासून ५० हजार फूट उंचीवर गेल्यावर कसं वातावरण असेल अश्या प्रकारची कृत्रीम व्यवस्था त्यांनी एका खोलीत केली. त्यांनी एकेकाला कमी दाब असलेल्या खोलीत (लो प्रेशर चेंबर) डांबायला सुरुवात केली. काही काळानं त्यातले ८० लोक ऑक्सिजनच्या अनुपलब्धेमुळे मेले. आणि उरलेल्या लोकांना रॅशर आणि त्याचे सहकारी यांनी ठार मारलं. कारण त्यांच्या शरीराचं यांना विच्छेदन करयाचं होतं ! हे कमी म्हणून की काय रॅशर अनेकदा या लो प्रेशर चेंबरमधे असणाऱ्या लोकांच्या मेंदूचं जिवंत असतानाच विच्छेदन करत असे. यामागे त्याला कमी दाबाखाली जिवंतपणी मेंदूमध्ये काय बदल होतात हे बघायचं होतं.
समुद्राच्या पाण्यावर जगवणं
फक्त समुद्राचं पाणी पिऊन माणूस जगू शकतो का ? हे हान्स एपिंजर या नाझी डॉक्टरनं पहायचं ठरवलं. या प्रयोगासाठी त्यानं ९० लोकांना काही दिवस उपाशी ठेवलं आणि नंतर त्यांना फक्त समुद्राचं पाणी प्यायला लावलं. अर्थातच समुद्राचं पाणी प्यायलं की अजूनच तहान लागते. हे लोक तहानेनं इतकी व्याकूळ व्हायचे की ते गोड्या पाण्याचा एक थेंब पोटात जाण्यासाठी चक्क नुकतीच पुसलेली फरशीही चाटायचे ! त्यापैकी बहुतांश माणसं शरीरातून पाणी कमी झाल्यानं आणि आतल्या अवयवांच्या कार्यामधे बिघाड झाल्यानं मेले होते. मानवी मूत्रपिंड (किडनीज) फक्त आपण प्यायलेल्या खारट पाण्यापेक्षा कमी कमी खारट मूत्र तयार करू शकतं. म्हणजेच शरीरातलं मीठ काढून टाकण्यासाठी भरपूर पाण्यात ते विरघळावं लागतं. पण ते विरघळवण्यासाठी जितकं पाणी लागतं त्यापेक्षा खूप कमी पाणी आणि जास्त मीठ समुद्राच्या पाण्यातून लोकांच्या पोटात जात होतं त्यामुळे त्यांना प्रचंड तहान, उलट्या, जुलाब आणि आतल्या आत रक्तस्त्राव, रक्तदाब अश्या कारणांनी मृत्यू आला होता. आताच्या माहितीप्रमाणे माणूस समुद्राच्या पाण्यावर फक्त सहा दिवस जेमतेम जगू शकतो.
गोठवणारे प्रयोग
काही युद्धांदरम्यान जर्मनीच्या सैनिकांना गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागायचा. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉ. रॅशरनं एक प्रयोग आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी डचाऊ तुरुंगात डांबलेल्या साधारणपणे ३०० माणसांना या प्रयोगासाठी घेतलं. त्यापैकी काहींना त्यांनी बर्फामध्ये पुरलं तर काहींना नग्न करून शून्य अंश सेल्सियस तापमानाच्या हवेत सोडलं. एकदा का या माणसांच्या शरीराचं तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा साधारणपणे १५ अंशांनी कमी झालं की रॅशरची माणसं त्यांना थंडीतून बाहेर काढून उबदार स्लिपिंग बॅग्जमध्ये झोपवत असत, किंवा गरम पाण्याच्या टबात बसवत असत, किंवा उन्हात बसवत असत किंवा त्यांना चक्क संभोग करायला लावत असत. पण दुर्दैवानं त्यातली एक तृतीयांश माणसं मरत असत. यातून नाझी डॉक्टर्सनी कुडकुडणाऱ्या लोकांना गरम पाण्याच्या टबमध्ये बसवलं तर ते वाचण्याची शक्यता सगळ्यात जास्त होती असे निष्कर्ष काढले होते.
नसबंदी
सगळ्या ज्यू लोकांना मारणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर नाझींनी कमीत कमी वेळात आणि कमी साधनांमध्ये त्यांची नसबंदी कशी करता येईल याबद्दलचे प्रयोग करण्याचा घाट घातला. अश्विट्स, रेव्हेन्सब्रूक आणि इतर ठिकाणच्या डॉक्टरांनी हे प्रयोग केले. या प्रयोगांमध्ये तरूण मुलांच्या टेस्टीजवर हानीकारक किरणांचा मारा केला. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी त्यांच्या टेस्टिकल्स काढून घेतल्या.
बायकांच्या गर्भाशयमुखामधून गर्भाशयामध्ये जळजळीत रसायनं सोडली. त्यामुळे गर्भाशयाची त्वचा जळायची, बायकांना योनीमार्गातून प्रचंड रक्तस्त्राव व्हायचा. पोटात प्रचंड कळा यायच्या. यातून अनेक स्त्री -पुरुषांच्या शरीराची कधीही भरून न निघणारी हानी झालीच पण त्यांच्या मनावरपण याचे गंभीर परीणाम झाले.
कृत्रिम वीर्यदान
एका नाझी ऑफिसरच्या बायकोला मूल होत नव्हतं. तिच्यावर केलल्या यशस्वी उपचारांची माहीती हेन्रिच हिमलर याला मिळाली. ही बातमी ऐकून त्यानं अॅश्विचमधल्या ३०० बायकांवर कृत्रिम वीर्यरेतन करण्याचा प्रयोग आरंभला. पण हे करताना त्यानं त्या बायकांची अतिशय क्रूरपणे विटंबना केली आणि त्यांना आपण त्यांच्या गर्भाशयात रानटी प्राण्यांचं वीर्य सोडलं आहे आणि आता त्यांच्या पोटात जनावरं वाढताहेत असा समज करून देऊन त्यांचा प्रचंड मानसिक त्रास दिला.
अर्थात हे सगळे प्रयोगांना बळी पडलेले लोक रक्तस्त्राव होऊन किंवा महत्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साकाळून मृत्यूमुखी पडले हे सांगायला नको.
वंश वाढवण्याचे प्रयोग
ज्यू वंशाचा सर्वनाश व्हावा त्याच प्रमाणे आपला आर्य वंश वाढावा यासाठीही नाझींनी प्रयोग केले होते. मग एकाच वेळी एका बाईला जुळी मुलं होण्यासाठी त्यांचे प्रयोग सुरु झाले. डॉ. जोसेफ मेंगल हे प्रयोग करण्यात पुढे होता. या प्रयोगात जुळ्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी १००० जुळ्या मुलांच्या जोड्या निवडल्या होत्या. या प्रयोगात त्यांनी या मुलांची वय, वजन, उंची वगैरे अशी सगळी मोजमापं घेतल्यानंतर त्यांच्या हृदयातच चक्क क्लोरोफॉर्म हे भूलीचं औषध टोचलं. या प्रयोगात बहुतांश मुलं मेली. फक्त २०० जोड्याच जगल्या.