भाग – १८ मेस्मर आणि मेस्मरिझम २

आपले प्रयोग आणि प्रात्यक्षिकं करताना मेस्मर या सगळ्या प्रयोगाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगे. प्रयोगाच्या वेळी बराचसा काळोख करून शक्य तितक्या कमी प्रकाशातच जादूगारासारखे किंवा मांत्रिकासारखे गडद रेशमी पायघोळ अंगरखे घालून मागे वाजणाऱ्या हार्मोनिका या वाद्याच्या पार्श्वभूमीवर तो आपले प्रयोग करे. त्याच्या हातात बऱ्याच वेळा एक लोखंडी दांडी असे. आपण कुठलाही रोग बरा करू शकतो, असा दावा तो करे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणि आश्चर्यही अनेक पटींनी वाढे. थोडक्यात, 1785 सालापर्यंत या प्रयोगातलं विज्ञान जवळपास संपलंच होतं. आता त्यानं चक्क जादूटोणा किंवा चमत्कृतीचे प्रयोग असंच स्वरूप धारण केलं होतं. या प्रयोगांना जरी लोकांची झुंबड उडत असली तरी पॅरिसमधले वैज्ञानिक मात्र त्याच्यावर खूपच वैतागायला लागले.

मेस्मरचा स्वत:वर वाजवीपेक्षा जास्त विश्वास होता. इतका की, त्या डॉक्टर्संना मेस्मरनं धडा शिकवायचं आणि एकदाचं ‌‘दूध का दूध, पानी का पानी’ करायचं ठरवलं. यासाठी मेस्मरनंच स्वत: आपली राजाबरोबरची ओळख वापरून आपल्या दाव्याचा पडताळा करण्यासाठी राजालाच एक चौकशी आयोग नेमण्याची विनंती केली. शेवटी, ‌‘मेस्मर बरोबर आहे की नाही’ हे ठरवण्याकरता एकूण तीन चौकशी आयोग नेमले गेले. अतर्क्य प्रयोगांमधून जगाला भुलवणाऱ्या विस्मयकारक मेस्मरचा स्वित्झर्लंडमध्ये 5 मार्च 1815 रोजी वयाच्या ऐंशिव्या वर्षी मृत्यू झाला! पॅरिसमधून बाहेर पडल्यावर त्यानं आपल्या आयुष्यातली तब्बल 30 वर्षं स्वित्झर्लंडमध्ये चक्क अज्ञातवासात काढली होती!!

इकडे मेस्मरनं फ्रान्स सोडल्यानंतरही तिथे मेस्मरिझमचं हे खूळ पूर्णपणे नष्ट झालं नव्हतं. ते उलट पुन्हा वाढलं. याच काळात मेस्मरिझम फ्रान्समधून जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिका इथेही पसरला होता. त्याचा लोकांवर एवढा पगडा होता की, मेस्मरची पद्धती न वापरणाऱ्या डॉक्टर्सनाही मेस्मरिझम टाळता येईना. चांगल्या डॉक्टर्सनाही त्यांच्याकडे उपचारांसाठी आलेले रुग्ण ‌‘तुमच्याकडे चुंबक आहे का’ किंवा ‌‘तुम्ही मेस्मरिझमची उपचारपद्धती वापरता का?’ असं विचारायला लागले. लोकाग्रहास्तव मग काही चांगले डॉक्टर्स उगाचंच गोंधळ नको म्हणून व्यवस्थित औषधं वगैरे दिल्यावर चुंबकाचाही वापर आणि विचित्र हातवारे करायला लागले.

मेस्मरिझमचा प्रभाव कमी होत नाही असं लक्षात आल्यावर 1820 साली त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधे दुसरा एक चौकशी आयोग नेमण्यात आला. अनेक वर्षं अभ्यास केल्यानंतर हा दुसरा चौकशी आयोग एका धक्कादायक निष्कर्षापर्यंत पोहोचला. ‌‘मेस्मरच्या पद्धतीनं रुग्णांना खरंच बरं वाटतं; त्यात बरंचसं तथ्य आहे आणि इतर डॉक्टर्सना जमणार नाही अशी ताकद या उपायांमध्ये आहे’, असं त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं. या उपायांमुळे एकाच्या मनातले विचार दुसऱ्याच्या मनात थेटपणे, कुठलंही माध्यम न वापरता जाऊ शकतात असंही ठोकून दिलं होतं! बंद पाकिटातली पत्रंही या उपायांमुळे वाचता येतात अशीही चक्क थापाथापी या दुसऱ्या चौकशी आयोगाच्या अहवालात होती! यामुळे चांगले डॉक्टर्स प्रचंडच वैतागले. या चौकशी आयोगावर भरमसाट टीकाही झाली आणि या गदारोळात मग याची शहानिशा करण्यासाठी तिसरा चौकशी आयोग नेमण्यात आला. या आयोगानं खऱ्या डॉक्टर्सची बाजू घेत ‌मेस्मरच्या थिअरीमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं. यानंतर मात्र फ्रान्समधून मेस्मरिझमच्या थिअरीचं जवळपास पूर्णपणे उच्चाटन झालं; पण इंग्लंडमध्ये मात्र त्याची लोकप्रियता पुन्हा वाढत चालली होती. ड्युपोटे आणि एलियटसनही मेस्मरिझमच्या इंग्लंडच्या नाट्यातली मुख्य पात्रं होती.

बॅरॉन ड्युपोटे हा फ्रेंच चुंबकतज्ज्ञ इंग्लंडच्या भूमीवर अवतरला आणि 1836 साली त्यानं या बाबतीत खूपच खळबळ माजवून दिली. यामुळे लंडनमधल्या एका अतिशय प्रसिद्ध डॉक्टरची कारकीर्द उद्ध्वस्त होणार होती. ड्युपोटे इंग्लंडमध्ये येण्याअगोदर काहीच काळ जॉन एलियटसन (1792-1868) या डॉक्टरची लंडनमधल्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ‌‘चेअर ऑफ मेडिसिन’ या पदावर नेमणूक झाली होती. एलियटसननं ड्युपोटेचं स्वागतच केलं. एवढंच नाही; तर ड्युपोटेचं पहिलं भाषण ऐकल्यानंतर तर एलियटसननं त्याला चक्क युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी 1828 साली आमंत्रण दिलं.

हे प्रयोग गंमतशीरच झाले. ड्युपोटेच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि जॉन एलियटसनसारख्या प्रसिद्ध माणसानं हे प्रयोग आयोजित केले असल्यामुळे वातावरणात खूपच दबदबा निर्माण झाला होता. त्यामुळे दबावाखाली येऊन ज्यांच्यावर हे प्रयोग होत होते, त्यांच्याकडून ड्युपोटेच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्याचप्रमाणे ते वागायला लागले. उदाहरणार्थ, ‌‘आता तुम्ही ट्रान्समध्ये जा’ असं ड्युपोटेनं त्यांना सूचित केल्यानंतर प्रयुक्तांनी खरंच ट्रान्समध्ये गेल्यासारखं वागायला सुरुवात केली. हे बघून एलियटसन खूपच आश्चर्यचकित आणि प्रभावित झाला. त्यानंही एलियटसननंही मेस्मरिझमचे उपचार आपल्या इस्पितळात करायला सुरुवात केली. मात्र इस्पितळानं याला आक्षेप घेतला.

या मेस्मरवादी नाट्यामध्ये आता दोन बहिणींनी प्रवेश केला. त्या ‌‘ओके सिस्टर्स’ म्हणून प्रसिद्धीस आल्या. त्यांच्यावर जेव्हा प्रयोग केले जात, तेव्हा त्या पूर्णपणे ट्रान्समध्ये जात असत आणि खूपच विचित्रासारखं कायकाय करायला लागत. त्यामुळे बघ्यांची खूपच करमणूक होई. यामुळे त्यांना अशा प्रयोगांची बोलावणी आणखीनच जास्त यायला लागली. काही काळातच त्या चक्क स्टार बनल्या! त्यांची वागणूक मात्र खूपच विक्षिप्त होती. त्यामुळेच या प्रयोगांच्या वेळी खूपच चित्रविचित्र प्रकार घडत. यातली बरीचशी प्रात्यक्षिकं एलियटसनच्या कॉलेजमध्येच होत असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाविषयी खूपच बोलबाला झाला होता. एलियटसनला विचित्र आणि अ-वैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन दिल्याबद्दल बरीच कुप्रसिद्धीसुद्धा मिळाली होती. लॅन्सेट या प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित मासिकाच्या उपसंपादकांनीसुद्धा या बहिणींच्या विचित्रपणावर ताशेरे ओढले होते. शेवटी कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी इलियटसनला हा सगळा प्रकार थांबवायला सांगितला. एलियटसन अर्थातच खूप वैतागला. ‌‘मेस्मर आणि मी यांनी रुग्णांना बरं करण्याची एक खूप महत्त्वाची पद्धत शोधून काढली आहे आणि या शोधाचं महत्त्व मानवी इतिहासात वाफेच्या इंजिनएवढंच मोठं आहे’ असं एलियटसननं म्हणायला सुरुवात केली. कॉलेजला अर्थातच हे मुळीच पटलं नाही. त्यामुळे एलियटसनची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली! पण आश्चर्य म्हणजे, जरी एलियटसनकडे आता विद्यापीठातली मानाची खुर्ची आणि हुद्दा नसला, तरीसुद्धा त्याच्या कारकिर्दीत खूप भरभराट झाली!

चुंबकत्व आणि झोपेत चालणं यांच्या संबंधांवर त्या काळी बराच विचार चालू होता. झोपेत माणसं मैलोनमैल रस्त्यावर, मळ्यात चालतात, छपरावरही चढून जातात आणि जागेपणी ज्या गोष्टी करू शकणार नाहीत, त्या ते सहजपणे झोपेत असताना करतात. पण हा जादूटोणा नसून त्याची कारणं वैज्ञानिक पद्धतीनं शोधता येतात, यावर आता लोकांचा विश्वास बसायला लागला.

यानंतर मात्र, जवळपास एक शतकभर सगळ्या जगावर जादू टाकणाऱ्या मेस्मरिझमचा ऱ्हास होत गेला आणि शेवटी, तो इंग्रजी भाषेत एक शब्द म्हणूनच शिल्लक राहिला!

Scroll to Top