प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीरातला रक्ताचा प्रवास याची देही याची डोळा पाहण्याची विलक्षण उर्मी ज्याला स्वस्थ बसू देत नव्हती असा विल्यम हार्वे (१ एप्रिल १५७८ -३ जून १६५७) नावाचा वैद्यकाचं शिक्षण घेणारा विद्यार्थी १५९९ पासून इटलीतल्या पडुआ विद्यापीठात शरीरशास्त्र आणि सर्जरी यांचे प्रयोग करत होता.
‘रक्त हृदयातून सोडलं जातं आणि ते चक्राकार पद्धतीनं शरीरात फिरत असतं’ हा शोध लावून विल्यम हार्वेनं जगाला रक्ताभिसरणाचं दर्शन घडवलं. पण त्याकाळी या थिअरीवरुन त्याची प्रचंड चेष्टा झाली आणि अनेकांनी ती थिअरी अमान्यही केली. हार्वेच्या समकालिन मंडळींनी तर त्याला वेड्यातच काढलं. विल्यम हार्वेनं मात्र रक्त शरीरात कसं खेळतं हे लोकांना प्रत्यक्ष दाखवलं. त्यासाठी त्यानं जे केलं त्याला आज आपण फारच निर्घृण कृत्य असं म्हणू ! पण त्यावेळी हार्वेकडे दुसरा उपायच नव्हता.
पडुआमधून पदवी मिळाल्यानंतर लुडगेट इथल्या आपल्या लाकडी घरात हार्वेचं संशोधन सुरु होतं. घरातल्या एका खोलीचंच त्यानं डिसेक्शन चेंबर बनवलं होतं. तिथं त्यानं अनेक प्रकारचे मासे, सरपटणारे प्राणी, बेडूक, कासव असे उभयचर प्राणी आणि सस्तन प्राणी पाळले होते. प्राण्यांचं हृदय कसं असतं, ते नेमकं काय काम करतं हे पाहण्याचं विलक्षण वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे डिसेक्शन टेबलावर सतत बाजूच्या संग्रहालयातला कुठला ना कुठला प्राणी हार्वेकडून धारातीर्थी पडायचा. शिवाय तो जिवंत प्राण्यांचंही विच्छेदन करत असे. एक मात्र नक्की की हृदयाचं कार्य जाणून घेण्याच्या त्याच्या ध्येयापुढे इतर कोणत्याही गोष्टींची त्यानं पर्वा केली नाही. प्राण्यांचं हृदय कसं दिसतं आणि काय करतं इथपर्यंत सगळं शोधून काढण्यासाठी हार्वेनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची शेकडो विच्छेदनं केली आणि त्यांच्या हृदयाची हालचाल, रक्तवाहिन्यांमधून फिरणारं रक्त यांचा अभ्यास केला.
प्राण्यांवर प्रयोग करताना त्यांच्या निरनिराळ्या रक्तवाहिन्या बांधून आणि रक्तप्रवाह अडवून काय होतं ते हार्वेनं पाहिलं. त्यावेळी त्याला शिरांना नेहमीच अडथळ्याच्या जवळ पण हृदयाच्या विरुध्द बाजूला फुगवटा येत असल्याचं दिसून आलं. याचा अर्थ शिरांतून वाहणारं रक्त हृदयाकडे जातं पण ते हृदयाच्या विरुद्ध बाजूला परत फिरू शकत नाही असं त्याच्या लक्षात आलं. त्यानं जेंव्हा धमन्यांत अडथळा आणण्यासाठी असेच प्रयोग केले तेव्हा अडथळा निर्माण केलेल्या ठिकाणीच, पण हृदयाच्या बाजूला धमनीतलं रक्त साचत असल्याचं त्यानं पाहिलं. यावरून धमन्यांतून रक्त हृदयाकडून इतर भागांत प्रवाहित होत असलं पाहिजे असं त्याच्या लक्षात आलं. हृदयाचं स्पंदन होताना रक्त हृदयाकडून धमनीमार्फत दूर ढकललं जातं आणि पुन्हा शिरांमधून ते हृदयाकडे आणलं जातं; अशा प्रकारे सर्व प्राण्यांत आणि माणसांत देखील रक्त वर्तुळाकार फिरतं हे हार्वेनं दाखवून दिलं. हेच ते रक्ताभिसरण.
हृदय हे पंपासारखं असून त्याच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर हृदयातून शरीरात किती रक्त पाठवलं जातं आणि ठरावीक वेळात हृदयाचं किती वेळा आकुंचन होतं हेही त्यानं मोजलं. एका तासात माणसाच्या वजनाच्या तिप्पट रक्त त्याचं हृदय पंप करतं असं त्याला दिसून आलं. निरोगी प्रौढ माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला ७२ ठोके पडतात असं मानलं तर १ तासात या माणसाच्या हृदयाकडून २४५.५० लिटर्स रक्त शरीरात सोडलं जायला हवं असं हार्वेनं गणितानं सिद्ध केलं. यावरून दररोज तितकं रक्त त्याच्या शरीरात तयार होणं शक्य नाही. यावरून तेच रक्त पुन्हा पुन्हा शरीरात फिरत राहतं हेही स्पष्ट झालं. यातून १६२८ मध्ये त्यानं रक्ताभिसरणाचा सिद्धांत मांडला. हार्वेनं शिरा आणि धमन्या यांमध्ये अतिसूक्ष्म छिद्र असावीत असंही सांगितलं. पण त्यावेळी त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व तो सिद्ध करू शकला नाही.
हार्वे १६२९ मध्ये युरोपच्या प्रवासाला निघाला. पुढली ३० वर्षं त्यानं हा प्रवास केला. १६३६ मध्ये तो जर्मनीतल्या न्युरेंम्बर्ग या शहरात गेला. त्याच्या सिद्धांतावर टीका करणाऱ्या कॅस्पर हॉफमनला त्याला तो सिद्ध करून दाखवायचा होता. त्यासाठी न्युरेंम्बर्गच्या अल्डडॉर्फ विद्यापीठामध्ये हार्वेनं एक सनसनाटी प्रात्यक्षिक करायचं ठरवलं. १८ मे १६३६ चा दिवस. विद्यार्थी आणि प्रोफेसर्स यांनी खचाखच भरलेल्या अॅनॅटॉमिकल थिएटरमध्ये अंगात पांढरा गाऊन आणि डोक्यावर पांढरी टोपी अशा वेशात ५८ वर्षांच्या हार्वेनं प्रवेश केला. प्रथम लॅटिन भाषेतून त्यानं पुढच्या रांगेत बसलेले प्रोफेसर्स, मागे बसलेले विद्यार्थी आणि सर्वात मागच्या काही रांगांत जमलेले नागरिक यांना उद्देशून एक भाषण केलं. त्यात त्यानं रक्ताभिसरण कसं होतं याचं थोडक्यात वर्णन केलं. धमन्या आणि शिरा यांच्यातून गुंफलेल्या रक्ताभिसरण संस्थेत रक्त हृदयाकडून पूर्ण ताकदीनं सोडलं जातं आणि ते चक्राकार पद्धतीनं शरीरात फिरतं असं त्यानं सांगितलं.
हार्वेचं व्याख्यान सुरू असतानाच विद्यापीठाच्या शिपायांनी एक कुत्रा तिथे आणला. समोरच्या डिसेक्शन टेबलवर त्यांनी कुत्र्याला आडवं झोपवलं, त्याचे पाय टेबलाच्या खांबांना बांधले आणि तो भुंकू नये म्हणून त्याचं तोंडही बांधलं. आता हार्वे उपस्थितांना म्हणाला, ”हृदयाची हालचाल आणि कार्य कसं चालतं हे मेलेल्या माणसांचं विच्छेदन करून पाहण्यापेक्षा जिवंत प्राण्यांत पाहणं नक्कीच सोपं आहे!’ ‘मग हार्वेनं एक धारदार सुरा कुत्र्याच्या छातीत खुपसला आणि त्याचं धडधडणारं हृदय सर्वांना दाखवलं. कुत्र्याचं हृदय वर-खाली लयबद्द हालचाल करताना सर्वांनी पाहिलं. यानंतर ‘रक्त जेव्हा हृदयातून बाहेर पडतं, त्यावेळी हृदयाचं होणारं आकुंचन हे हृदयाचं कार्य आहे, कसं ते मी तुम्हाला दाखवतो’ असं म्हणून त्यानं त्या कुत्र्याची फुप्फुस धमनी कापली. त्याबरोबर रक्ताचं जोरदार कारंजं उडालं. डिसेक्शन टेबलाजवळ गर्दी केलेल्या प्रेक्षकांना तर रक्तस्नान घडलंच; शिवाय कैक फूट लांबवर रक्ताचे शिंतोडे उडाले. साऱ्यांच्या तोंडून आश्चर्योदगार बाहेर पडले !
धडकत्या हृदयाची आणि रक्ताभिसरणाची कथा सांगणारा हा अवलिया ३ जून १६५७ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी लंडनमध्ये मेंदूत रक्तस्त्राव होऊन मरण पावला.