आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं म्हणजे नेमकं काय होतं हा प्रश्न माणसाला मागची कितीतरी शतकं सतावत होता. एकोणिसाव्या शतकापर्यंत आपल्या पोटात काही अॅसिड्स असतात आणि काही पाचक रस असतात. त्यांच्यामुळे अन्न पचतं हे माहित झालं होतं. अन्नपचन कसं होतं या समस्येची उकल होण्याच्या इतिहासातली महत्वाची पण चमत्कारिक घटना एकोणिसाव्या शतकात घडली. त्याची ही गोष्ट !
६ जून १८२२ या दिवशी सकाळी अमेरिकेतल्या मिशिगनच्या रस्त्यावर अलेक्सिस सेंट मार्टिन (Alexis St. Martin) या विशीतल्या धडधाकट तरुणाला तो काहीतरी विकायला उभा असताना त्याला तीन फुटांवरुन चुकून बंदुकीची एक गोळी लागली. ती गोळी त्याच्या छातीच्या डाव्या भागात लागली होती. या अपघातानं मार्टिनच्या शर्टाला आग लागली आणि तो कोसळलाच. सगळ्यांना तो आता मेलाच असणार असं वाटलं होतं. पण तरी त्याला अमेरिकेच्या आर्मीचा डॉक्टर असलेला विल्यम ब्यूमाँट (William Beaumont) याच्याकडे आणलं. ब्यूमाँटनं त्याला तपासलं तेव्हा ती गोळी त्याच्या अनेक बरगड्या तोडून, डायफ्रॅम (फुप्फुसाचं आवरण) आणि डावं फुप्फुस यांना इजा करुन त्याच्या पाठीतून आरपार निघून गेली होती. या अपघातामुळे मार्टिनच्या फुप्फुसाचा अंड्याएवढा भाग त्या जखमेतून बाहेर लटकत होता. त्याची बरीचशी त्वचा भाजली होती आणि जखमी झाली होती.
गंमत म्हणजे या जखमेतून मार्टिननं सकाळी केलेला नाष्टा त्याच्या आतड्यातून पुढे पुढे जाताना दिसत होता ! त्याला मलमपट्टी केल्यानंतर मार्टिन हा ३६ तासांपेक्षा जास्त जगेल असं वाटत नाही असं ब्यूमाँटनं सांगितलं होतं. पण आश्चर्य म्हणजे मार्टिन जगला आणि त्याच्या जखमाही हळू हळू भरुन यायला लागल्या ! पण त्याच्या आतड्याला पडलेलं भोक मात्र बुजलं नव्हतं. ब्यूमाँटनं त्याला सलाईन देऊन देऊन जिवंत ठेवलं होतं. आता फक्त एकच प्रश्न उरला होता. तो म्हणजे मार्टिननं काहीही खाल्लं तरी ते अन्न त्या छिद्रातून बाहेर पडत होतं. पण ब्यूमाँटनं त्याची जखम घट्ट बंद केली की अन्न पुढे जाऊ शकत होतं.
असं करता करता मार्टिन पूर्णपणे बरा झाला. फक्त आतड्यापर्यंत डोकावणारं भोक त्याच्या शरीरावरुन स्पष्ट दिसत होतं. ब्यूमाँटनं त्याला ते शिवून बंद करुन टाकतो असंही सुचवलं होतं पण आधीच हा प्रयत्न एकदा करुन झाला होता. आणि सारखं मलम पट्टी करुन आता मार्टिनही वैतागला होता. त्यामुळे त्यानं पुन्हा जखम शिवायला नकार दिला. नंतर मात्र त्याच्या शरीरानं त्या भोकावर आपोआपच फ्लॅपसारखा एक त्वचेचा पडदा तयार केला होता. तो पडदा कधीच पूर्ण बंद झाला नाही; इतकं की ब्यूमाँटचं एक बोट मात्र त्यातून सहज आत जाऊ शकत होतं !
आता मात्र या पेशंटचा उपयोग प्रयोगासाठी करायचा असं ब्यूमाँटनं ठरवूनच टाकलं. या भोकामुळे ब्यूमाँट मार्टिनच्या शरीरात चाललेलं अन्नपचन पूर्णपणे पाहू शकत होता ! मग ब्यूमाँटनं मार्टिनच्या पोटातल्या त्या भोकामध्ये शिजवलेले, कच्चे, मांस, फळं, भाज्या असे अनेक पदार्थ वेगवेगळ्या वेळी लटकावून ठेवायला सुरुवात केली आणि नंतर थोड्या थोड्या वेळानं तो त्या भोकामधून हे पदार्थ बाहेर काढून त्यांचं तो निरीक्षण करत असे. अश्या प्रकारे ब्युमाँटनं मार्टिनवर शेकडो प्रयोग केले.
एकदा त्यानं या छिद्रात ठेवलेलं बीफ तर पाच तासांच्या आत पूर्णपणे पचून नाहिसं झाल्याचं त्यानं पाहिलं ! त्या मानानं ब्रेड पचायला कमी वेळ लागत होता आणि कोबीसारख्या कच्च्या भाज्या पचायला खूपच वेळ लागतो असं त्याच्या लक्षात आलं.
हे प्रयोग करताना मार्टिन आणि ब्युमाँट यांची जोडी छानच जमली होती. पोटातल्या छिद्रात जाणार्
या वेगवेगळ्या नळ्या आणि पिशव्या खांद्याला अडकवून मार्टिन ब्युमाँटच्या घरी नोकरासारखं काम करायचा. तर ब्यूमाँट त्याला आपल्यासोबत नायगरा, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी फिरायला आणि प्रयोगांची प्रात्यक्षिकं करायला घेऊन जायचा. पण मध्येच एकदा ती दोघं मार्टिनच्या मूळ गावाच्या जवळ कॅनडाला गेलेले असताना. आपली मायभूमी पाहून मार्टिनला तिथेच थांबायचा मोह आवरला नाही आणि ब्यूमाँटला एकट्याला तिथून परतावं लागलं.
पण नंतर दोन वर्षांनी शोधाशोध केल्यानंतर मार्टिननं आता लग्न केल्याचं कळलं; पण तो आधीपेक्षाही प्रचंड हालाखीच्या परिस्थितीत रहात होता. त्यावर ब्यूमाँटनं त्याला पुन्हा आपल्याकडे यायची आणि पुन्हा एकदा प्रयोगांमध्ये भाग घ्यायची विनंती केली. आणि मार्टिन पुन्हा ब्यूमाँटकडे आला !
यापुढे मार्टिननं निघून जाणं आणि ब्यूमाँटनं त्याला पुन्हा बोलावून आणणं असं अनेकदा झालं. मार्टिनच्या जिवावर ब्यूमाँटनं अक्षरश: शेकडो प्रयोग केले आणि पचनाविषयी अनेक निष्कर्ष काढले. या प्रयोगांवर आधरित ब्यूमाँटनं पुढे पुस्तकही लिहिलं. त्यात त्यानं आपले युगप्रवर्तक असे ५१ निष्कर्ष लिहिले होते. त्यात त्यानं कोणते पदार्थ पचायला किती वेळ लागतो हे सांगितलं होतं. शिवाय दूध पचतं म्हणजे त्याचं दही होतं, मांस पचायला ब्रेडपेक्षा जास्त वेळ लागतो हे त्यानं विस्तृतपणे सांगितलं होतं. याशिवाय पोटातल्या पाचक रसांचा त्यानं सखोलपणे अभ्यास केला होता. या सगळ्या गोष्टींमुळे ब्यूमाँट पुढे ‘फादर ऑफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजी’ म्हणजेच पचनसंस्था आणि पोटातल्या अवयवांच्या अभ्यासाचा प्रणेता झाला !
ब्यूमाँटच्या नंतर पुढे मार्टिन अनेक वर्षं जगला. जेव्हा १८८० साली म्हणजे पोटाला गोळी लागल्यानंतर चक्क ५८ वर्षांनी मार्टिनचा मृत्यू झाला, तेव्हा मात्र अनेक जणांनी त्याच्या पोटाची बायॉप्सी करावी आणि त्यांचं पोट आर्मी मेडिकल म्यूझियम मध्ये प्रदर्शनात ठेवावं असं सुचवलं होतं. पण मार्टिनच्या घरच्यांना आता हा त्याच्या जिवाशी होणारा खेळ नकोसा झाला होता. निदान मेल्यावर तरी त्याला शांती मिळावी म्हणून मार्टिनच्या घरच्यांनी त्याला पुरण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी चर्चमध्येही नेलं नाही; तर त्याला त्याच्या रहात्या घराच्याच जमिनीमध्ये आठ फूट खोल खड्डा खणून पुरुन टाकलं !