भाग ३ – ब्लड लेटिंग

वैद्यकाच्या इतिहासात ‘ब्लडलेटिंग’ म्हणजे ‘रक्त वाहू देणं’ हा कोणत्याही रोग्याला बरं करण्यासाठी डॉक्टर मंडळींकडून केला जाणारा प्रथमोपचार होता आणि हा उपाय इतका क्रूर आणि भयंकर होता की त्यातून त्या रोग्याचा रोग बरा होणं हा निव्वळ अपघातानं घडलेला योगायोग असायचा. नाहीतर बऱ्याचदा अशी माणसं रोगापेक्षा या अघोरी उपचारानंच दगावायची.
ब्लडलेटिंगमुळे रोग्याला आराम पडतो हे माणसाला का आणि केव्हा सुचलं याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही. पण इजिप्तमध्ये सुमारे ३००० वर्षांपूर्वी ब्लडलेटिंगची पद्धत वापरली जायची. प्राचीन इजिप्तची राजधानी असलेलं मेंम्फिस इथे एका थडग्यावर एका रुग्णाच्या पायातून आणि मानेतून ब्लडलेटिंग करतानाचं एक चित्र कोरलेलं आहे.
पाश्चिमात्य वैद्यकाचा पितामह हिप्पोक्रेट्स यानं ख्रिस्तपूर्व चौथ्या आणि पाचव्या शतकात ब्लडलेटिंग हा उपचारांचा एक प्रकार असल्याचं लिहून ठेवलंय.
रक्त हे केवळ शरीराचं पोषण करणारं नव्हे तर ते माणसाच्या ‘आत्म्याचा अर्क’ आहे असं गेलन या महान ग्रीक वैद्यानं सांगितलं. गेलननं आपल्या सुमारे १२० पुस्तकांमध्ये ब्लडलेटिंगचा जोरदार पुरस्कार केला.


पर्शियन डॉक्टर अवीसेना यानं माणसाला ज्ञात असलेल्या सर्व प्रकारच्या विकारांवर ब्लडलेटिंग हाच प्रभावी उपचार असल्याचं सांगितलं. अवीसेनानं रुग्णाच्या ज्या भागात आजार किंवा वेदना असतील त्याच्याविरुद्ध भागातून ब्लडलेटिंग करण्याला प्राधान्य दिलं. म्हणजे समजा रूग्णाच्या डाव्या नाकपुडीतून रक्त येत असेल, तर अवीसेना त्याच्या उजव्या हाताच्या शिरेतून रक्त काढायचा.
मध्ययुगात तर ब्लडलेटिंगला प्रचंड महत्त्व आलं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोणत्याही प्रकारच्या व्याधींवर ब्लड लेटिंग हा हमखास प्रभावी उपाय समजला जायचा. त्यावेळी डॉक्टरमंडळींनी ब्लडलेटिंगसाठी योग्य मुहूर्त कोणता हे खगोलशास्त्राच्या आधारानं सांगणारे तक्तेही तयार केले होते. याच काळात सर्जरी करणं किंवा ब्लड लेटिंग करणं डॉक्टर्सना कमी दर्जाचं वाटायला लागलं. ते रुग्णांना फक्त अमुक एक सर्जरी करुन घ्या किंवा ब्लड लेटिंग करून घ्या असा सल्ला द्यायचे. त्यामुळे डॉक्टर मंडळींना त्यांच्या रूग्णांचं ब्लडलेटिंग करायला न्हाव्यांची मदत घ्यावी लागली.

यातून ‘बार्बर सर्जन्स’ उदयाला आले. ते आपल्या केशकर्तनाच्या कामात वाकबगार असले तरी ते काही डॉक्टर नव्हते. तरीही त्यांनी ब्लडलेटिंगचा ताबाच घेतला. सर्जन्स आणि औषधविक्रेते यांच्याकडून प्रशंसा मिळवण्यासाठी या न्हाव्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. आपण कसे कुशल ‘फ्लेबोटोमिस्ट’ म्हणजेच रक्त काढण्याचं तंत्र अवगत असणारे आहोत याची जाहिरात करायला त्यांच्या दुकानाबाहेर लाल आणि पांढऱ्या पट्ट्या गुंडाळलेला एक खांब असायचा.
त्यावेळी ‘लॅन्सेट’नावाचं ब्लेडसारखं उपकरण शिर कापायला वापरायचे. दोन्ही टोकांना निमुळती धारदार पाती असलेली लॅन्सेट्स खिशात घेऊनच न्हावी आणि डॉक्टर मंडळी फिरायची. १६२३ साली ‘लॅन्सेट’ हे सुप्रसिध्द मेडिकल जर्नल सुरू झालं तेव्हा त्याचं नाव याच उपकरणावरुन पडलं होतं.
न्युमोनिया, अनेक प्रकारचे ताप, पाठदुखी, यकृत आणि स्प्लीन यांचे आजार, संधिवात, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, पक्षाघात यापासून ते अनेक मनोविकार अशा सगळ्या आजारांवर एकमेव इलाज म्हणजे रुग्णाचं रक्त वाहू दिलं जाणं असं डॉक्टरांना वाटायचं. अगदी १९२० सालापर्यंत अमेरिकेतले डॉक्टर्स आपल्या रूग्णांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांना वर्षातल्या ठरावीक काळात ब्लडलेटिंग करून घ्यायचा सल्ला द्यायचे.


‘पन्स ऑफ ब्लीडर्स’ म्हणून अठराव्या शतकात प्रचंड प्रसिद्ध झालेला डॉक्टर बेंजामिन रश हा एक वल्लीच होता. ब्लडलेटिंगच्या दरम्यान रुग्णाला घेरी आली तर हा शुभसंकेत आहे; कारण याचा अर्थ शरीर उपचारांना प्रतिसाद देतंय असं रश म्हणायचा. आपल्या शिरांत प्रत्यक्ष असतं त्याच्या दुप्पट रक्त माणसाच्या शरीरात असतं आणि त्यातनं ८०% रक्त आपण काढून टाकू शकतो असं रशला वाटायचं. रशनं ब्लडलेटिंगचं प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या कैक पिढ्या घडवल्या. शेवटी १८११ साली ६७ वय असताना रशला कसलासा ताप आला. तो बरा होत नाहिये हे पाहून रशनं डॉक्टरला बोलावलं आणि आपल्या अंगातलं रक्त काढून घ्यायला सांगितलं. डॉक्टरनं तसं केलं; पण रशचा त्यातच मृत्यू झाला !
१४ डिसेंबर १७९९ चा दिवस! अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन नुकताच निवृत्त झाला होता त्या दिवशी त्याच्या फेयरफॅक्स काऊंटी इथल्या ‘माऊंट व्हेरनॉन’ या हवेलीवर जेम्स क्रेक याला तातडीनं बोलावण्यात आलं. गेली ४० वर्षं जेम्स हा जॉर्ज वॉशिंग्टनचा खाजगी डॉक्टर होता. १२ डिसेंबरला वॉशिंग्टन व्हर्जिनियाच्या फार्मवर घोड्यावरून रपेट मारायला बाहेर पडला तेव्हा खूपच बर्फ पडलेलं होतं. आणि ओले कपडे अंगावर असतानाच वॉशिंग्टननं जेवण केलं. थंडीचं निमित्त होऊन दुसऱ्या दिवशी त्याला सर्दी झाली. त्यानं त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण १४ डिसेंबरला तो झोपून उठला तेव्हा त्याला बोलायलाही त्रास होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याला खायला-प्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टर जेम्स यायच्या अगोदर त्याच्याच सांगण्यावरून जॉर्ज रॉलिन्स या त्याच्या एका सेवकानं त्याचं ब्लडलेटिंगही केलं. पण काही तासातच तो तापानं फणफणला. एवढ्यात डॉक्टर जेम्स क्रेक तिथे हजर झाला. तेव्हा पुन्हा जॉर्जचं ब्लडलेटिंग करण्यात आलं. डॉक्टर क्रेकनं जॉर्जच्या घशाला काही जळजळीत औषधी पदार्थांचं पोटीस लावलं. पण तरीही जॉर्ज वॉशिंग्टनला काही आराम पडेना. मग त्याला उलटी होण्यासाठी औषधं देऊन पाहिली. तरीही लक्षणं गंभीरच दिसत होती. जेम्स क्रेकनं मग गुस्ताव ब्राऊन आणि एलिश डिक या आणखीन दोन डॉक्टरांना बोलावून घेतलं. जॉर्जवर पुन्हा तीन वेळा ब्लडलेटिंगचा उपचार करण्यात आला आणि जवळजवळ ४ लिटर रक्त काढून टाकण्यात आलं. आता वॉशिंग्टनच्या शरीरातलं बरचसं रक्त काढून टाकण्यात आलं होतं. पण जॉर्जची अवस्था आणखीनच खालावली. अखेर दुपारी ५ वाजता त्यानंच डॉक्टरांना आपण आता जगणार नाही असं सांगितलं आणि त्याच रात्री तो मरण पावला. खरंतर त्याला घश्याचं इन्फेक्शन झालं होतं. योग्य उपचारांनी तो बराही होऊ शकला असता. पण खूप मोठ्या प्रमाणावर ब्लडलेटिंगमुळे तो मरण पावला.

Leave a Comment

Scroll to Top