काही कापल्यावर, पडल्यावर, लागल्यावर एखादी लहानशी जखम झाली तर आज आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही. पण दोनशे वर्षांपूर्वी अशी जखम मृत्यूचं कारण होऊ शकायची. पण हे समजणं त्याकाळी अवघड होतं. त्याच वेळी पारतंत्र्यात असलेल्या हंगेरीतला एक तरूण डॉक्टर आपल्यावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रियामध्ये काम करताना संसर्गजन्य रोगांच्या मुळाशी जाऊन त्यांचं कारण शोधणार होता. त्याचं नाव होतं इग्नास सेमेल्वाइस.
इग्नास सेमेल्वाइसचा जन्म १ जुलै १८१८ रोजी हंगेरीतल्या त्या काळातल्या बुडा नावाच्या गावात, आताच्या बुडापेस्टमध्ये झाला. त्यानं १८४४ साली आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.
व्हिएन्नाच्या अवाढव्य हॉस्पिटलमध्ये त्यानं नोकरी धरली. तिथे तो गरीब स्त्रियांच्या बाळंतपणाच्या वेळी त्यांना मदत करत असे. तेव्हा एका वर्षात सुमारे ६०० ते ८०० स्त्रिया बाळंतपणाच्या वेळी मरायच्या. त्यांचं शवविच्छेदन करायची जबाबदारीही सेमेल्वाइसवरच असे. त्यातून त्याला खूप काही शिकायला मिळे. बाळंत होताच बाळाला जन्म दिलेल्या आईला दरदरून घाम फुटायचा, थंडी वाजून ताप यायचा, तिचं पोट सुजून वेदना व्हायच्या, तिच्या योनीमार्गामधून कसला तरी द्रवपदार्थ वाहायचा आणि तिच्या हाता-पायावर विचित्र डाग पडायचे. मग तिची नाडी धीमी होत ती मृत्यूपंथाला लागायची. सेमेल्वाइस जेव्हा त्यांची मृत शरीरं विच्छेदनासाठी उघडायचा तेव्हा त्याला त्यांच्या पोटात पूनं भरलेल्या जखमा दिसायच्या.
सेमेल्वाइसनं जेव्हा आपलं निरीक्षण चालू ठेवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की रुग्णालयातल्या दोन विभागांमध्ये साधारण तितक्याच स्त्रिया बाळंतपणासाठी दाखल व्हायच्या. दोन्हीकडे रोज दहा मुलं जन्माला यायची. विभाग क्रमांक १ मध्ये प्रसूतीतज्ज्ञ आणि त्यांचे विद्यार्थी दाखल झालेल्या स्त्रियांची काळजी घ्यायचे. तिथे वर्षाकाठी ६०० ते ८०० स्त्रिया दगावायच्या. याउलट विभाग क्रमांक २ मध्ये अशा स्त्रियांना सुईणी सांभाळायच्या, तिथे वर्षाकाठी फक्त ६०च स्त्रिया मरायच्या. या दोन विभागांमध्ये एकाआड एक दिवस स्त्रियांना प्रसूतीसाठी प्रवेश दिला जाई. त्यामुळे सम तारखांना दाखल होणाऱ्या स्त्रिया जणू नशीबवान आणि विषम तारखांना दाखल होणाऱ्या कमनशिबी असाव्यात की काय असा हा अजब प्रकार होता ! याहूनही कहर म्हणजे घरी किंवा प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये येताना चक्क रस्त्यात प्रसूत होणाऱ्या स्त्रिया बहुतेक वेळा ठीकठाक राहायच्या ! हा नक्की काय प्रकार आहे या प्रश्नानं सेमेल्वाइसला भंडावून सोडलं होतं.
त्यानं या दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीचा, तिथल्या वातावरणाचा आणि स्त्रिया मृत्यूमुखी पडण्याच्या एकूण एक कारणाचा सखोल अभ्यास केला. दोन्हीकडे जवळपास सारखीच परिस्थिती होती; फरक इतकाच होता की पहिल्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनही होत होतं आणि प्रसूतीही होत होती आणि दुसरं हॉस्पिटल फक्त प्रसुतीसाठी राखीव होतं. पण हे मृत्यूचं कारण कसं होऊ शकेल अश्या विचारांनी सेमेल्वाइस अस्वस्थ झाला होता. त्याच दरम्यान एक वाईट घटना घडली.
सेमेल्वाइस एकदा सुट्टीवर असताना त्याच्याऐवजी त्याचा मित्र कोलेट्स्का एका मृतदेहाचं शरीरविच्छेदन करत असताना त्याच्या बोटाला जखम झाली. त्यातून कोलेट्स्काला कसला तरी संसर्ग झाला आणि काही दिवसांमध्येच तो वारला. यामुळे खचून गेलेल्या सेमेल्वाइसनं कोलेट्स्काच्या शरीरविच्छेदनाचा अहवाल पुन्हा पुन्हा वाचला. ज्या तऱ्हेनं आणि वेगानं प्रसूतीसाठी आलेल्या अनेक स्त्रिया मरायच्या त्याच प्रकारे कोलेट्सकाही मेला असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि सेमेल्वाइसची ट्यूबच पेटली !
शवविच्छेदन करताना वापरलेली दूषित हत्यारं प्रसूती करताना वापरल्यामुळेच असं काही तरी घडत असणार याचा सेमेल्वाइसला अंदाज आला होता आणि जर हत्यारांमधून हे जंतू एकीकडून दुसरीकडे जात असतील तर ते माणसांचे अवयव आणि कपडे यांच्याद्वारेही पसरणं अशक्य नाही हे त्याला उमगलं होतं.
अक्षरश: अगणित वेळा तो आणि त्याचे सहकारी शवविच्छेदनाच्या टेबलावरुन थेट बाळंतपणासाठी नवीन दाखल झालेल्या बाईच्या मदतीसाठी धावायचे. अर्थातच त्यांच्या हातांना आणि कपड्यांना रोगजंतू तसेच चिकटलेले असायचे आणि ते त्या दुर्दैवी बाईच्या शरीरात शिरायचे ! हे कारण होतं की काय या सगळ्या मृत्यूंचं? असा विचार डोक्यात आल्यावर सेमेल्वाइस अगदी थिजूनच गेला. त्याचा वरिष्ठ असलेल्या जोहान क्लाईनची परवानगी घेऊन त्यानं कुठल्याही तपासणीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर्स आणि विद्यार्थी तयार होण्यापूर्वी त्यांनी आपले हात ‘क्लोरिनेटेड लाईम’ या जंतूनाशकानं चोळून धुतले पाहिजेत असा एक नवीन नियम बनवला.
१८४७ सालच्या एप्रिल महिन्यात हा नवा नियम अंमलात येण्याआधी बाळंतपणाच्या वेळी दगावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण एकूण संख्येच्या १८.१३% होतं. मे महिन्यात हा नियम सगळ्यांनी पाळायला सुरुवात केली, आणि एक वर्षभरात सेमेल्वाइसनं केलेल्या हिशेबाप्रमाणे हे प्रमाण फक्त १.२% इतकं खाली आलं ! अतिशय सर्वसाधारण पार्श्वभूमीच्या एका माणसानं निव्वळ जिद्द, कमालीचं संवेदनाशील मन आणि न कंटाळता बारकाईनं केलेलं निरीक्षण यांच्या जोरावर अनेक शतकं जे कुणा महान संशोधकांना आणि डॉक्टरांना जमलं नव्हतं ते करुन दाखवलं होतं !
पण हे पाहून व्हिएन्नामधले सगळे डॉक्टर्स वैतागले आणि आम्ही रोग कसा पसरवू ? हा आमचा धडधडीत अपमान आहे असंच त्यांना वाटलं. त्यातून सेमेल्वाइस हा मूळचा हंगेरियन होता. त्यावेळी ऑस्ट्रियाचं हंगेरीवर राज्य होतं. त्यामुळेही इतर ऑस्ट्रियन डॉक्टर्स त्याला खालचं लेखीत. मग काही दिवस सेमेल्वाइसचं म्हणणं त्यांनी मानलं पण शेवटी सगळ्यांनी मिळून सेमेल्वाइसला तिथून हाकलून लावलं आणि मग पुन्हा एक दशकभर पूर्वीसारखं हात न धुता काम सुरू झालं. मृत्यूचं प्रमाण पुन्हा वाढलं. पण डॉक्टरांचा अहंकार मधे आला. इकडे सेमेल्वाइस हंगेरीत बुडापेस्टला गेला. तिथं त्यानं आपल्या नियमांनी मृत्यूचं प्रमाण कमी केलं. पण दैवदुर्विलास बघा ! शेवटी तो स्वतः अपघातानं झालेल्या संसर्गामुळे तोच ताप येऊन वयाच्या ४७व्या वर्षी १८६५ साली मरण पावला !