०१ विचित्र वैद्यक – प्रस्तावना (१७११२२)(८०५)
वैज्ञानिक संशोधन ही एक अजबच गोष्ट आहे. त्यामध्ये शोधायला गेलो एक आणि हाती लागलं भलतंच असं अनेकदा होतं. जिथे जिथे माणसानं आपलं कुतुहल जागं ठेवून निरीक्षण केलं तिथे तिथे त्याला काहीतरी नवीन सापडलं आहे. विश्वाचं रूप जसं अचाट आणि अगाध आहे तसं माणसाचं शरीर आणि मन हीसुद्धा माणसासाठी कोडीच आहेत. शरीर किंवा मन कशानं आजारी पडेल आणि कोणत्या उपायांनी बरं होईल या गोष्टींचा शोध मागची काही हजार वर्षं माणूस घेतोय. अर्थातच या प्रवासात अनेक ज्ञात आणि अज्ञात संशोधक, वैज्ञानिक, डॉक्टर्स, मानसरोगतज्ज्ञ आहेत. या शोधांनी आणि अनेक रुग्णांच्या चित्र-विचित्र केसेसनी वैद्यकाची वाट रोमहर्षक झाली आहे.
डायग्नोसिस हा एक ………. प्रकार आहे. उदाहरणार्थ घसा दुखतोय असं म्हणल्यावर ती अॅलर्जी असू शकते, इन्फेक्शन असू शकतं किंवा टॉन्सिल्सही सुजलेल्या असू शकतात. मग नेमकं काय झालं असावं याचं निदान कसं करणार ? यासाठी वैद्यकशास्त्राची एक मोठी शाखाच निर्माण झाली. पण हे शास्त्र निर्माण होताना अनेकदा चुका झाल्या. चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांचे बळी गेले; तर अनेकदा काही उपचार अचानकपणे सापडले ! काही वेळा काही केसेस खूप वेगळ्या आणि एकमेव घडतात आणि अश्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांचं ज्ञान, अनुभव आणि प्रसंगावधान पणाला लागतं. वैद्यकशास्त्रात आणि मानसशास्त्रात घडलेल्या विचित्र केसेस, अनपेक्षितपणे लागलेले शोध आणि करायला जावं एक आणि हाती लागावं भलतंच अश्या प्रकारातल्या भन्नाट कथा आणि अनेक किस्से आहेत. त्यांच्याविषयीचंच हे सदर आहे !
यामध्ये आपल्याला आश्चर्यचकित व्हायला लावणाऱ्या तर कधी भीतीनं थरकाप उडायला लावणाऱ्या कित्येक कथा भेटतील; तर कधी एखाद्या वैज्ञानिकानं धारिष्ट्यानं लावलेला एखादा शोध असेल; तर कधी अचानकपणे एखाद्या असाध्य वाटणाऱ्या आजारावर अनपेक्षितपणे सापडलेला इलाज असेल. तर कधी एखाद्या शल्यक्रियातज्ज्ञानं तयार केलेलं एखाद्या शस्त्रक्रियेचं तंत्र असेल. या सगळ्या प्रवासाची रोमहर्षक सफर या वर्षी ‘विचित्र वैद्यक’ या सदरातद्वारे करूया.
यातल्या शोधकथा विस्मयकारक आहेत. आपल्या पोटात अन्न पचतं म्हणजे ते मिक्सरमधून काढल्यासारखं घुसळून निघतं की एखाद्या अॅसिडमध्ये कपडा वितळावा तसं रसायनांद्वारे मूळ पोषक द्रव्यांत रुपांतरीत होतं ? हा प्रश्न माणसाला अनेक शतकं स्वस्थ बसू देत नव्हता. अनेकांनी अनेक प्रकारे याचा शोध घेऊन अन्न कसं पचतं याबद्दल अनेक थिअरीजही मांडल्या होत्या. पण त्यातली कोणतीच परिपूर्ण नव्हती. यानंतर मात्र एक चमत्कारिक घटना घडली १८२२ साली अमेरिकेतल्या रस्त्यावर काहीतरी विकणाऱ्या एका मुलाच्या पोटाला अचानक एक बंदुकीची गोळी लागली. त्याला लगेचच तिथल्या डॉ. ब्यूमाँट नावाच्या डॉक्टरकडे आणलं गेलं. “हा मुलगा ७२ तासांपेक्षा जास्त जगणार नाही.” असा डॉ. ब्यूमाँटनं शेरा मारल्यानंतरही हा मुलगा जगला आणि त्याची जखमही हळूहळू भरून आली. पण आश्चर्य पुढेच आहे. त्याच्या पोटाला मात्र एक फ्लॅपसारखं छिद्र राहिलं आणि त्यातून पोटात नेमकं काय चाललं आहे हे चक्क दिसायचं ! याचा फायदा घेऊन ब्यूमाँटनं या मुलावर पुढची अनेक दशकं अभ्यास केला आणि आपली पचनसंस्था कशी काम करते हे चक्क शोधून काढलं !
हृदयविकार झाला की काही वेळा हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागते. पण शस्त्रक्रिया करताना हृदय बंद करुन कसं ठेवणार ? आणि चालू ठेवलं तर त्यावर शस्त्रक्रिया कशी करणार ? या कोड्याची उकल काही वैज्ञानिकांना होत नव्हती. पण बर्लिनचा डॉ. वेर्नेर फोर्समन यानं या प्रश्नाच्या मुळाशी जायचा चंगच बांधला. चालू हृदयावर प्रयोग करण्यासाठी कुणी तयार होईना म्हणून फोर्समननं स्वतःच स्वतःवर प्रयोग केले. हे करताना त्यानं चक्क एक नळी आपल्या दंडातल्या धमनीतून खांद्यामध्ये आणि तिथून धडधडत असलेल्या हृदयामध्ये घातली ! आणि ती नक्की हृदयातच पोचली का हे तपासण्यासाठी त्याच अवस्थेत स्वतः दोन मजले चढून छातीचा एक्सरे फोटोग्राफ काढायला गेला !
१९६० साली अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात काही लोकं शोधमोहिमेला गेले. सोबत असू द्यावा डॉक्टर म्हणून त्यांनी एका २७ वर्षांच्या लिओनीड रोग्झोव या डॉक्टरलाही सोबत घेतलं पण तिथे गेल्यावर त्याच डॉक्टरला अपेंडिसायटिस अॅटॅक आला. आता तिथून सगळ्यात जवळ असणारं हॉस्पिटलही ३००-४०० किलोमीटर होतं. मग या शूर डॉक्टरनं स्वतःच स्वतःला स्थानिक भूल (लोकल अॅनॅस्थॅशिया) दिली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःला ग्लानी येत असताना, दर ५ मिनिटांनी २०-२५ सेकंदाची विश्रांती घेऊन स्वतःच स्वतःवर ऑपरेशन केलं !
पोटातली आतडी शिवण्याऐवजी शर्टाला बटन लावतो तसं आतड्यांना एकत्र आणून बटन का लावू नये असा विचार करणारा ‘द सर्जिकल जिनियस’ म्हणून ओळखला गेलेला डॉ. जॉन बी मर्फी यानं चक्क धातूचं बटन आतड्यांमध्ये बसवायला सुरुवात केली !
भयानक संसर्गावर मात करणारं पेनिसिलिन हे पहिलं अँटीबायोटिक शोधणारा अलेक्झांडर फ्लेमिंग खरंतर सुटीनंतर कामाला आलेल्या पहिल्याच दिवशी आपली प्रयोगशाळा आवरत होता. नको असलेल्या पेट्री डिशेस आणि उगाचच वाढलेले बॅक्टेरिया आणि बुरशी यांचे नमुने फेकून देत होता. हे करताना एका पेट्रीडिशमध्ये त्याला चक्क उगवत्या सूर्याचा भास होईल असं चित्र तयार झाल्यासारखं वाटलं ! त्यानं ते फेकून देण्याऐवजी त्याचा अभ्यास केला तर ती माणसाला संसर्ग करणारे खतरनाक जंतू मारणारी बुरशी निघाली ! या बुरशीचा अर्क म्हणजेच पेनिसिलिन !
गंमत म्हणजे मिझोप्रोस्टॉल हे रसायन पोटातले अल्सर बरे करण्यासाठी १९७० मध्ये अमेरिकेत तयार झालेलं औषध होतं. पण त्याचे साईड इफेक्ट्स इतके भयानक होते की त्यामुळे गर्भवती बायकांचा चक्क गर्भपात व्हायचा. त्यामुळे आता हे रसायन सुरक्षित गर्भपात करण्यासाठीच वापरलं जातं !
तर अश्या या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वैद्यकातल्या नवलकथा ! काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचार ! या कथांनी मनोरंजन तर होतंच पण माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहल आणि अनपेक्षितरीत्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध.. या गोष्टींनीच तर वैद्यकाचं विश्व समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या सुरस कथा वाचायला चला तर मग, विचित्रवैद्यकाच्या रंजक सफरीवर…