भाग ५ – केमोथेरपीचा जन्म

एकोणिसावं शतक संपत आलं तेव्हा सगळीकडेच; विशेषत: युरोप, अमेरिका या ठिकाणी उद्योगांचं वारं वहायला लागलं होतं. इतर अनेक उद्योगांप्रमाणे कपड्यांना कृत्रिमरीत्या रंगवता येईल का यावरही वैज्ञानिक काम करत होते. त्याच वेळी पॉल अर्लिच हा वैद्यकाचा विद्यार्थी आपल्या प्रोजेक्टसाठी विषय शोधत होता. त्यावेळी कपड्यांना रंग देण्यासाठी अ‍ॅनिलिन डाय या नव्या कृत्रिम रंगाचा शोध लागला होता. हा रंग जर आपण प्राणी आणि माणूस यांच्या टिश्यूजना देऊन पाहिला तर कदाचित आज मायक्रोस्कोपमधून आपल्याला न दिसणाऱ्या पेशी आणि उती यांच्यामधले काही भाग दिसण्याची शक्यता निर्माण होईल. असं अर्लिचला वाटलं त्यामुळे अर्लिच याच गोष्टीच्या मागे लागला. कोणताही नवा रासायनिक रंग मिळाला की तो पेशी आणि उती यांना लाव आणि मग पेशी आणि उती कशा दिसतात ते पहा याचं सत्र त्यानं सुरु ठेवलं. त्याच दरम्यान रॉबर्ट कॉख या वैज्ञानिकानं क्षयाच्या जंतूंना रंगवण्यासाठी कोणत्या तरी रंगाचा शोध लावला आहे, असं अर्लिचला कळलं. त्यामुळे अर्लिचनं काही काळ रॉबर्ट कॉखसोबतही काम केलं. पण पेशींना रंगवण्याची मूळ कल्पना फिरुन फिरुन त्याच्या डोक्यात परत येत होती.


एका रात्री अर्लिच एका कॉन्फरन्सहून ट्रेननं परत येत होता. ट्रेनमधले सगळे प्रवासी झोपलेले असताना अर्लिच मात्र विचार करत होता. एखाद्या विशिष्ट रसायनानं विशिष्ट प्रकारच्या पेशींना रंगवता आलं तर किती बरं होईल. त्यातूनही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यातली फक्त एकच पेशी रंगवून दुसरी तशीच ठेवता आली तर ? जेव्हा एखादी बॅक्टेरियाची पेशी माणसाच्या काही पेशींवर हल्ला करते तेव्हा जर निरोगी मानवी पेशी सोडून फक्त बॅक्टेरियाच्याच पेशींना मानवी शरीरात असताना मारता आलं तर ? अर्थात मध्यरात्रीच्या ट्रेनच्या प्रवासात सुचलेली ही कल्पना पुढे ‘केमोथेरेपी’ला जन्म देणार आहे हे त्याक्षणी तरी पाऊल अर्लिच याला वाटलं नव्हतं !
केमोथेरेपी- विशिष्ट रसायनांनी विशिष्ट पेशी मारणं.. अर्थात ‘स्पेसिफिक अ‍ॅफिनिटी’ ही संकल्पना काही कॅन्सरच्या उपचारांसाठी निर्माण झालेली नव्हती. त्यानंतर अर्लिचनं अक्षरश: हजारो रसायनांच्या चाचण्या सुरू केल्या. त्यानं उंदीर आणि ससे यांना अनेक संसर्गजन्य रोगांचे जिवाणू टोचले आणि संसर्ग झाल्यानंतर त्यांना वेगवेगळी रसायनं टोचायची अशा प्रकारच्या प्रयोगांचा त्यानं धडाकाच लावला. त्यानं हजारो रसायनांवर प्रयोग करुन पाहिले. त्यानंतर त्याला ‘ट्रायफॅन रेड’ या नावाच्या रसायनानं अक्षरश: जादूसारखे परिणाम मिळाले. या रसायनंनानं संसर्ग अक्षरश: थांबल्यासारखा झाला होता. या शोधानं त्याला बायोकेमिस्ट्रीचं अवघं विश्वच आपल्यासमोर उभं असल्यासारखं वाटायला लागलं. या शोधासाठी त्याला १९०८ चं नोबेल पारितोषिकही मिळालं.


१९१० मध्ये ‘काँग्रेस फॉर इंटरनॅशनल मेडिसिन’ या चर्चासत्रामध्ये अर्लिचनं आणखी एक स्पेसिफिक अ‍ॅफिनिटी असलेलं रसायन सिफिलिसवर प्रभावी औषध आहे असं जाहीर केलं. त्या रसायनाचं नावच त्यानं ‘कंपाऊंड ६०६’ असं ठेवलं होतं ! कारण या आधी त्यानं ६०५ रसायनांवर प्रयोग केले होते आणि हे ६०६वं रसायन होतं. ही औषधं विशिष्ट पेशींना मारायची म्हणून आपण शोधलेल्या या औषधांना ‘अर्लिच मॅजिक बुलेट’ असं म्हणायचा.
यानंतर अर्लिचनं आपला मोर्चा मानवी कॅन्सरच्या पेशींकडे वळवला. त्यानं अनेक रसायनांवर प्रयोग केले. पण ज्या रसायनांनी कॅन्सरच्या पेशी मरत होत्या त्या रसायनांनी निरोगी मानवी पेशीही मरत होत्या आणि अर्लिचच्या मॅजिक बुलेट्स काही इथे काम करत नव्हत्या. पुढे १९१५ साली अर्लिच टीबीनं आजारी पडला. आणि पुढे त्याला काही काम करायलाही जमत नव्हतं. त्यातून त्याच्या जर्मनी या देशानं पहिल्या महायुध्दात उडी घेतल्याचं तो आपल्या डोळ्यांनी बघत होता. शिवाय त्याला वेगवेगळे डाय पुरवणाऱ्या ‘बायर अँड हेक्स्ट फॅक्टरीनं आता वॉर गॅसेस या प्रचंड विषारी रसायनांच्या निर्मितीला सुरुवात केली होती. त्यातला एक गॅस तर फारच विषारी होता. जळालेल्या लसणासारखा किंवा मोहोरीसारखा त्याचा वास यायचा. त्याचं नावही मग ‘मस्टर्ड गॅस’ असं पडलं.


१२ जूलै १९१७ या दिवशी सैन्याच्या दलावर पिवळ्या फुल्या असलेल्या लहान लहान शिंपल्यांचा वर्षाव झाला. त्यांचं लगेचच हिरव्या-पिवळ्या वाफेत रुपांतर होऊन ते उडूनही गेलं. (हाच तो मस्टर्ड गॅस.) पुढे काय होणार याचा काहीही अंदाज न येता सैन्य त्या रात्री झोपून गेलं. आणि सकाळी जेव्हा सगळे उठले तेव्हा सगळ्यांना मळमळत होतं आणि लगेचच त्यांना उलट्या, खोकला आणि शिंका सुरू झाल्या. रबर, चामडं आणि कपडे यांची आवरणं भेदून मस्टर्ड गॅस त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्या एकाच रात्री या गॅसनं दोन हजार सैनिकांचा बळी घेतला होता आणि त्यावर्षी आणखी लाखो लोकांचा बळी घेतला !
त्यानंतर १९१९ साली एडवर्ड आणि हेलन कृंभार यांनी या दुर्घटनेतून बचावलेल्यांवर अभ्यास सुरू केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या लोकांच्या हाडांमधल्या रक्तपेशी तयार करणाऱ्या पेशीच मरुन गेल्या आहेत आणि या लोकांना महिन्यातून किमान एकदातरी रक्त द्यावं लागतं ! याचाच अर्थ मस्टर्ड गॅस हे रसायन खूप मोठ्या प्रमाणावर वापरल्यामुळे अनेक सैनिकांच्या नाशाला जरी कारणीभूत ठरलं असलं, तरी ते वैशिष्ट्यपूर्णरीत्या फक्त बोनमॅरोवरच हल्ला करत होतं ! याचा उपयोग रक्ताच्या कॅन्सरवर करुन घेता आला तर ? आणि इथेच कॅन्सरवरच्या केमोथेरपीचा जन्म झाला. त्यामुळेच अनेक प्रकारची हानिकारक रसायनं कॅन्सरच्या उपचारांमध्ये औषधं म्हणून वापरण्यासाठी प्रयोग सुरू झाले आणि काही रसायनं मग त्यावर उपयोगीही सिध्द झाली.


त्यानंतर गिलमन आणि गुडमन यांनी केमोथरपीचा वापर करुन लिंफग्लँडवर उपचार तयार केले. ४८ वर्षांच्या एका सोनाराला लिंफग्लँड्सचा कॅन्सर झाला होता. त्याला त्यांनी मरस्टर्डची १० इंजेक्शन्स दिली. त्यानंतर या सोनाराच्या सुजलेल्या लिंफग्लँड्स आता अदृश्यच झाल्या होत्या. पुढेही या ड्रगनं आश्चर्यकारक परिणाम दाखवले आणि केमोथेरपीचा उदय झाला.

Leave a Comment

Scroll to Top