पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात १९२० साली जर्मनीमध्ये नाझी (नॅशनल सोशॅलिस्ट) या राजकीय पक्षाची स्थापना झाली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, देशप्रेम आणि ज्यूवंशाचा विरोध ही मूल्यं या पक्षाचा पाया होता. १९२१ साली अॅडॉल्फ हिटलर यानं नझी पक्षाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्यानंही बेरोजगारी आणि वंशभेद या मुद्द्यांचं भांडवल पुढे करुन प्रचंड राजकारण केलं आणि तो १९३३ साली जर्मनीच्या सत्तेवर आला. जर्मनीचा चान्सलर झाल्यानंतर हिटलर आणि त्याचे सहकारी यांनी इतर राजकीय पक्षं बरखास्त केले, विरोधकांना चक्क ठार मारून टाकलं किंवा तुरुंगात डांबलं; आणि नाझी जर्मनीची स्थापना केली.
नंतर हिटलरशाही उदयाला आली. त्यानं अनेक अमानवी फॅसिस्ट कायदे लागू केले. त्यातलाच एक भाग म्हणून जर्मन समाजाचं शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली आर्य वंश सोडून इतर सगळ्या वंशाचे लोक, अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद अशा सगळ्यांची सरसकट कत्तल चालवली. छळ होणाऱ्यांमधे कम्यूनिस्ट आणि ज्यू जास्त होते. ज्यांची कत्तल करणं जमलं नाही त्यांचं खच्चीकरण केलं. नाझी सैनिकांनी काही लाखो लोकांना एकएक करून मारलं नाही. त्यांनी एकाच वेळी अनेक लोक गुदमरुन किंवा हाल होऊन जळून मरतील असे कॅन्संट्रेशन कॅम्प्स आणि होलोकॉस्ट निर्माण केले.
आता ज्यू लोकांना मारायचंच आहे म्हटल्यावर वैद्यकातले वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना वापरण्याची हिटलरनं वैज्ञानिकांना परवानगी दिली. या प्रयोगांमधून काही चांगले शोध लागले ही गोष्ट जरी खरी असली तरी हे प्रयोग अत्यंत क्रूर, हिंसक, भयानक आणि मानवजातीला काळीमा फासणारे होते यात शंकाच नाही.
एकदा प्रयोग करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर जर्मनीच्या वैज्ञानिकांनीही माणसांवर अनेक अमानुश प्रयोग करायला सुरुवात केली. या प्रयोगांमधे भाग घ्यायची त्या लोकांची इच्छा असो वा नसो त्यांना त्यात होणारे अत्याचार सहन करावे लागत होते. या अत्याचारांना समाजाच्या हितासाठीच केले जाणारे प्रयोग असं गोड नाव दिलं होतं. विज्ञानाच्या नावाखाली झालेल्या या प्रयोगांना आता अनेक दशकं उलटून गेली असली तरी आजही हे भयंकर प्रयोग आपण विसरू शकत नाही. त्यातले काही प्रयोग असे होते –
विषप्रयोग –
बचेनवाड कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या वैज्ञानिकांनी मानवी शरीरावर विषाचा परिणाम कसा होते हे पहाण्याची योजना आखली. हे प्रयोग त्यांनी रशियन कैद्यांवर करण्याचं ठरवलं होतं. वैज्ञानिकांनी कैद्यांना फेनॉल, सायनाईड आणि इतरही अनेक प्रकारची विषं वेगवेगळ्या प्रकारे दिली. काही विषं त्यांनी जेवणात घालून दिली. काही विषं थेट प्यायला दिली तर काहींना विषारी गोळ्या झाडल्या. याहून वाईट गोष्ट म्हणजे जे कैदी या विषप्रयोगात मेले नाहीत त्यांना नाझी डॉक्टरांनी मारून टाकलं आणि त्यांच्यावर शवविच्छेदनाचे प्रयोग केले.
(हा लेख मुख्य म्हणजे मेडिकल साठी केलेल्या संशोधानासाठी लिहिला आहे व त्यांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे विश्लेषण आहे
यात “बचेनवाड” असा उल्लेख आला आहे हे नाव बरोबर नाही तर “Buchenwald” (बुखेन वाल्ड) हा “Weimar” शहरातील एक भाग आहे जिथे “Concentration Camp” होता. मी 1986जानेवारी मध्ये या concentration camp ला गेलो होतो.तिथले दृश्य पाहून अक्षरशः अंगावर काटा आला होता. दुसऱ्या महायुद्धाची मूळ कारणे पहिल्या महायुद्धात दडलेली आहेत. हिटलर ला तुरुंगात टाकल्यावर त्याने तिथे “Mein Kampf” हे आत्मचरित्र, राजकीय विचारधारा, जर्मनीचे भविष्य वगैरे मुद्द्यांवर पुस्तक लिहिले होते, ह्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तो वागत गेला.हिटलर सारखा अमानुष, क्रूर, हेकेखोर, दुराग्रही, हट्टी नेता होऊ नये हीच इच्छात्यानेच “Deusche Uber Alles” – म्हणजे जर्मन सर्वश्रेष्ठ आहेत हे सिद्धांत जर्मन लोकांना पटवून दिला. आज आपण जी VW ही कार बघतो – “Volks Wagan” म्हणजे Peoples Car ही हिटलरने चालू केली होती – एका वाचकाची कमेंट)
क्षयरोगावरची लस –
माणसामधे क्षयरोगावर मात करण्यासाठी काही प्रतिकारक्षमता असते का हे पहाण्यासाठी आणि क्षयावर लस तयार करण्यासाठी नाझी डॉक्टर कुर्त हेस्मेयर यानं एक प्रयोग तयार केला होता. हा प्रयोग न्यूएनगेम कॉन्संट्रेशन कॅम्पमधे झाला. या प्रयोगात डॉ. हेस्मेयरनं अनेक माणसांच्या फुफ्पुसातच थेट क्षयाचे जिवंत जंतू – (मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलोसिस) सोडले. यात कमीत कमी २०० लोक मेले. तर अनेक लहान मुलं पण मेली. पण याची चौकशी होणार असं कळल्यानंतर त्यानं उरलेल्या लहान मुलांना चक्क फासावरही लटकावून टाकलं.
विषारी वायूवर उतारा –
पहिल्या महायुद्धात फॉस्जेन नावाचा वायू सोडून अनेक सैनिकांना मारण्यात आलं होतं. त्यामुळे आता नाझी डॉक्टर्सनी या वायूवर उतारा शोधण्याचं ठरवलं. यात त्यांनी कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या ५२ कैद्यांना फॉस्जेन वायू दिला. हा प्रयोग त्यावेळी जर्मनीच्या प्रभावाखाली असलेल्या फ्रान्समधल्या स्टार्सबर्ग नावाच्या किल्ल्याजवळ केला होता. हा वायू दिलेल्या कैद्यांना फुफ्पुसात प्रचंड वेदना व्हायला लागल्या. त्यांच्या फुफ्पुसाला सूज आली होती. यात जवळपास सगळे कैदी मेले. नाझी वैज्ञानिकांच्या नोंदींनुसार अनेक कैदी आधीपासूनच अशक्त आणि कुपोषित होते. त्यामुळे ते मेले असं त्यांनी नंतर लिहिलं होतं.
रक्त गोठवण्याचे प्रयोग –
सिग्मंड राश्चर यानं बीटरूट आणि सफरचंद वापरून पॉलिगल नावाचं एक औषध तयार केलं होतं. या औषधानं जखमांमधून रक्त वहाणं थांबेल असा त्याचा दावा होता. याचे प्रयोग करुन पहाण्यासाठी त्यानं अनेक कैद्यांना या औषधाच्या गोळ्या चक्क बंदूकीच्या गोळ्यांप्रमाणे गळ्यात किंवा छातीमध्ये झाडल्या आणि त्याचे काय परिणाम होतात याचं निरीक्षण करत बसला.
याशिवाय त्यानं एका रक्तगटाच्या माणसांना वेगवेगळ्या रक्तगटांच्या माणसांचं रक्त दिलं तर त्याचे काय परिणाम होतात हे पाहिलं.
जखमांवरचे प्रयोग –
युद्धातल्या ज्या सैनिकांना जखमा होतात त्यावरचे उपचार शोधण्यासाठी आणि नवनवीन औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी नाझी वैज्ञानिक कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या स्त्री-पुरुषांना अशाच जखमा मुद्दामहून करत असत. नंतर त्या जखमांवर वैज्ञानिक धनुर्वात, स्ट्रेप्टोकोकस आणि गॅस गँगरीन असे भयानक आजार निर्माण करणारे वेगवेगळे रोगजंतू सोडत असत. आणि यातून झालेला संसर्ग आणखी वाढण्यासाठी या जखमावर लाकडाचा भुसा किंवा चक्क काचेचा चुरा चोळत असत. या जखमांवर ते सल्फानिलअमाइड या रसायनाचा औषध म्हणून कितपत उपयोग होतोय हे ते तपासत असत. (जखमेवर मीठ चोळणं हा आपल्याकडचा वाक् प्रचार यापेक्षा किती मृदू आहे हे आपल्या लक्षात येईल.)
अशा जखमा केलेल्या लोकांना प्रचंड वेदना होत असत. त्यांच्या जखमेतून रक्त, पू, दुर्गंधी असं सगळं वहात असे. त्यातून त्यांना रहायला आणि खायला अत्यंत गलिच्छ ठिकाणी ठेवलेलं असे. अर्थात यामुळे जंतूसंसर्ग वाढून अनेक लोक मरत असत. पण नाझी वैज्ञानिकांना त्यांची काही तमा नव्हती. या दिव्यातून जाऊनही यातून वाचलेल्या एका व्यक्तीनं याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. – “त्यांनी माझ्या तळहातावर सुमारे दहा से.मी. लांब आणि दोन सेमी रुंद आकाराच्या खोल जखमा केल्या होत्या. नंतर मला समजलं की त्या जखमा हेतूपूर्वकच निर्जंतूक न केलेल्या साधनांनी केलेल्या होत्या. जेणेकरून या उपकरणांतूनच मला संसर्ग व्हावा हा यामागचा हेतू होता. ही जखमही मला भूल न देता केली होती. नंतरचे काही दिवस त्यांनी त्या जखमेवर वेगवेगळी औषधं आणि मलमं लावलेल्या पट्या बांधायचं नाटक केलं. या पट्ट्याही ते संपूर्ण हाताभोवती न गुंडाळता फक्त जखम झाकली जाईल इतपतच होत्या. त्यातूनही जेव्हा जेव्हा माझी जखम बरी होत आलेली आहे असं त्यांना जाणवायचं तेव्हा ते हा सगळा प्रयोग पहिल्यापासून सुरु करायचे !”
पूर्वार्ध