१८व्या आणि १९व्या शतकात ‘मेस्मरिझम’ हा अचाट आणि विचित्र प्रकार धुमाकूळ घालणार होता आणि त्यात अनेक शिकलेले लोक सामील होणार होते हे सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. ‘मेस्मरिझम’ची ही विचित्र उपचारपद्धती म्हणजे नेमका काय प्रकार होता?
जर्मनीतल्या इझगँग खेड्यातल्या ‘कॉन्स्टन्झ’ नावाच्या एका तळ्याकाठच्या गावात २३ मे १७३४ रोजी फ्रॅन्झ मेस्मरचा जन्म झाला. १७५९ साली त्यानं व्हिएन्ना विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली आणि पीएच.डी.ही मिळवली. पीएच.डी.साठीच त्यानं एक ग्रंथ लिहिला होता. पण त्याच्या गाईडनं तो प्रबंध न वाचताच त्याला डॉक्टरेट पदवी बहाल केली ! समुद्राच्या भरती-ओहटीवर जसा चंद्राचा प्रभाव पडतो, तसाच माणसांवरही पडतो, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे, सूर्य आणि ग्रहतारे यांचाही परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो असं तो म्हणायचा. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच चुंबकही दुरूनच आपला जो प्रभाव टाकत असतो, तो याच माध्यमामुळे असला पाहिजे आणि गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच चुंबकत्वाचाही माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असला पाहिजे, असं मेस्मरला वाटे. याचा त्याला तपास घ्यायचा होता. मॅग्नेटिक थेरपीचा जन्म यातूनच होणार होता.
पदवी मिळाल्यानंतर मेस्मरनं व्हिएन्नातल्या सधन लोकांवर काही प्रयोग करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या प्रयोगांत मेस्मर रुग्णाच्या गुडघ्याला गुडघे टेकवून बसे. यानंतर तो रुग्णाचे आंगठे आपल्या हाताने दाबत त्याच्या डोळ्यांत रोखून पाही. मग तो रुग्णाच्या खांद्यापासून तळहातापर्यंत हात फिरवी. त्यानंतर आपल्या बोटांनी रुग्णांच्या बरगड्याखालच्या भागावर बराच वेळ दाब देई. या ‘उपचारानं’ रुग्णाला विचित्र जाणीवा होत किंवा आपल्याला आता बरं वाटतंय, असं उगीचच वाटायला लागे.
पण चुंबकत्वामुळे काही रोगांवर उपचार करता येतील, असं मात्र मेस्मरला त्या काळात मुळीच वाटत नव्हतं. पण नेमकं त्याच वेळी त्याला जेझुईट धर्मगुरू आणि खगोलशास्त्रज्ञ मॅक्समिलियन हेलची उपचारपद्धती आठवली. हेल आपल्या रुग्णांच्या अंगावर चुंबक बांधून उपचार करायचा. चुंबक आणि आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध असल्याचं एकदा त्यानं मेस्मरला सांगितलं होतं. त्यामुळे मेस्मरचा कल चुंबकत्वाकडे झुकायला लागला होता. १७७४ साली एका रुग्णामुळे त्याचा चुंबकत्वावरचा विश्वास दृढ झाला.
फ्रॅन्सिस्का ऑस्टर्लीन नावाच्या २८ वर्षीय तरुणीला हिस्टेरिया झाला होता. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिनं पूर्वी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत म्हटल्यावर मेस्मरलाही तिला आता कोणते उपचार द्यावेत हे कळेना. अचानक त्याला हेलच्या चुंबकीय उपचारपद्धतीची आठवण झाली आणि तेच उपचार त्यानं तिच्यावर करायचे ठरवले.
मेस्मरनं आधी तिला लोहाचा अंश असलेलं एक पेय दिलं. मग त्यानं शक्तिशाली चुंबक हातात घेतले. आता हळुवारपणे ते चुंबक तो तिच्या शरीराभोवती फिरवायला लागला. ते चुंबक फिरेल तसं तिच्या शरीरातलं लोह फिरतंय असं त्याला वाटत होतं. थोडक्यात ते चुंबक तिच्या शरीरातल्या लोहाचा प्रवाह नियंत्रित करतंय असं मेस्मरला वाटत होतं. ऑस्टर्लीनलाही तसाच भास व्हायला लागला होता. ती हळूहळू थरथर कापायला लागली. थोड्या वेळातच ऑस्टर्लीन बेशुद्ध पडली. त्यात मेस्मरला काहीच वावगं वाटलं नाही. थोड्या वेळानं ती शुद्धीवर आली, तेव्हा तिला चक्क बरं वाटायला लागलं होतं. आता मेस्मरचा आत्मविश्वासही वाढला. आपल्याला रामबाण उपचारपद्धती सापडली आहे असं त्याला वाटायला लागलं. आणखी काही दिवस हेच उपचार देऊन शेवटी मेस्मरनं ती पूर्ण बरी झाल्याची घोषणा केली!
आता मेस्मरचा चुंबकत्वावर विश्वास बसला. ‘प्रत्येक सजीवाच्या शरीरात एका प्रकारचा चुंबकीय द्रव फिरत असतो. हा द्रव जर संतुलित असेल, तर आरोग्य चांगलं राहतं. पण तो द्रव जर कुठे अडकला, तर मात्र तो सजीव आजारी पडतो’. चुंबकाचा वापर करून तो द्रव संतुलित करता येतो, अशी त्याची थिअरी होती. नंतर त्यानं अनेक रुग्णांवर असा उपचार केला.
थोड्याच काळात त्यानं अनेक रुग्णांवर एकावेळी उपचार देणारी नव्या उपचारपद्धतीची निर्मिती केली. एका टबमध्ये चुंबकत्व प्राप्त झालेला कीस पसरायचा. त्या टबच्या मध्यापासून परिघाकडे जाणारे लोखंडाचे काही दंडुकेही त्या टबात ठेवायचे. त्यामुळे त्या चुंबकीय लोखंडी किसातून त्या लोखंडी दंडुक्यामध्ये चुंबकत्व यायचं. मग मेस्मर सगळ्या रुग्णांना टबच्या भोवती बसायला सांगून त्या दंडुक्यावर हात ठेवायला सांगे. मग तो त्यांच्या समोरून फिरे, मधूनमधून त्यांच्या डोळ्यांत अशा प्रकारे बघे, की त्यांची तंद्री लागे. तोपर्यंत रुग्णाच्या शरीरावर चुंबकत्वाचा परिणाम व्हायलाही सुरुवात झालेलीच असे. या प्रक्रियेत कित्येक रुग्णांना मानसिक आणि शारीरिक ‘टर्ब्युलन्स (कोलाहल)’ आणि डिस्टर्बन्स जाणवे. पण या कोलाहलानंतर कित्येक रुग्ण खऱ्या अर्थानं पूर्णपणे बरे झालेले नसले, ‘बरं झालोय’ असं वाटणाऱ्या रुग्णांची संख्या मेस्मरला अधिकाधिक प्रसिद्धी मिळवून देण्याइतपत नक्कीच होती!
अनेक डॉक्टर्सना मेस्मरचे हे उपचार आणि दावे खोटे आहेत याची खात्री होती. पण त्यांच्याजवळ तसे पुरावे नव्हते. शेवटी जान इंगेनहाउस नावाच्या एका डॉक्टरनं मेस्मरची पोलखोल केलीच. मेस्मरला आता पुन्हा स्वत:ला सिद्ध करावं लागणार होतं. १७७७ साली त्याच्याकडे आलेल्या एका तरुणीमुळे त्याला ही संधी मिळाली.
तिचं नाव मारिया पॅरेडीस असं होतं. वयाच्या तिसऱ्या वर्षीच ती अचानक दृष्टिहीन झाली. ती अतिशय सुंदर पिआनो वाजवायची. पण तिच्या वडिलांना मात्र तिची दृष्टिहीनता मान्य नव्हती. तिला बरं करण्यासाठी ते अनेक वर्षं प्रयत्न करत होते. अनंत डॉक्टर्सना दाखवूनही तिच्यावर कुणाला उपचार जमले नव्हते. शेवटी त्यांनी तिला मेस्मरकडे पाठवलं. मेस्मरनं तिच्यावर मॅग्नेटिझमचे उपचार सुरू केले. पण आता पॅरेडीसचे वडील भलत्याच चिंतेत पडले. पॅरेडीस दृष्टिहीन होती, म्हणून तिचा चाहता वर्ग मोठा होता. पण तिला दिसायला लागल्यावर त्यांचं प्रमाण घटेल की काय, अशी त्यांना भीती वाटायला लागली. दुसरीकडे स्वत: पॅरेडीसला या सततच्या उपचारांचा वीट आला होता. दरम्यान तिला आता थोडंसं दिसायला लागलं आहे असा मेस्मरनं सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्षात तिला दिसायला वगैरे काही लागलेलं नव्हतं.
१७७८ साली शेवटी पॅरेडीसच्या वडिलांनी मेस्मरचे हे उपचार थांबवले आणि मेस्मरचा हा दावा किती खोटा आहे हे लक्षात आलं. ही बातमी सगळीकडे पसरली. मग मेस्मरनं तिला आपण तिच्यासमोर असतानाच दिसतं असं सांगून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण मेस्मरची बाजू समजून घेणारं आता व्हिएन्नामध्ये कुणीच नव्हतं. व्हिएन्नामधल्या डॉक्टर्सनी मेस्मरविरुद्ध तो एक ठग, ढोंगी आणि फसवणारा आहे असं म्हणून बोंबाबोंब करायला सुरुवात केली. शेवटी या सगळ्याला वैतागून एके दिवशी मेस्मर व्हिएन्ना सोडून पॅरिसमध्ये निघून गेला !