जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन याला वयाच्या सत्तरीत असताना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला होता. असा पोटदुखीचा एक अॅटॅक आलेला असताना त्याला हॉस्पिटलमधे दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा त्याच्या पोटात चेंडूच्या आकाराचा गोळा हृदयाच्या धडधडीप्रमाणे धडधडत असलेला जाणवला. प्रिन्स्टनमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हा काय प्रकार आहे हे लगेचच ओळखलं. पोटामधल्या मुख्य अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी मोठी धमनी (अॅऑर्टा) प्रमाणापेक्षा प्रसरण पावली होती. इतकी की ती एखाद्या फुग्यासारखी पोटातच फुगली होती. तिच्यातून वहाणाऱ्या रक्ताचं प्रेशर प्रचंड होतं. ही धमनी कधीही फुटण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी आइन्स्टाइनला लगेचच ऑपरेशन करुन घ्यायचा सल्ला दिला; पण त्यानं तो मानला नाही. या प्रसंगानंतर मात्र त्यानं आपलं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा हाच प्रसंग आला. या वेळी त्याच्या पोटातली ती धमनी आणखी जास्त फुगली होती. आता तर लगेचच ती फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. डॉक्टरांनी याहीवेळी आइन्स्टाइनला ताबडतोब ऑपरेशन करुन घेण्याची विनंती केली. पण याहीवेळी आइन्स्टाइननं नकार दिला आणि ‘अशाप्रकारे कृत्रिमरीत्या वाढवलेल्या आयुष्यावर माझा विश्वास नाही. मला आयुष्यात जे काम करायचं होतं ते मी केलं आहे. आता फुटायची रक्तवाहीनी तर फुटू दे’ असं म्हटलं. आणि खरोखरच पुढच्या तीन दिवसात ती धमनी फुटली आणि १८ एप्रिल १९५५ या दिवशी आइन्स्टाइनचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याला अग्नी देण्यात आला; पण त्याचा मेंदू अभ्यासासाठी काढून घेण्यात आला.
आइन्स्टाइनला झालेला आजार हा ‘अॅब्डॉमिनल अॅऑर्टिक अन्यूरिझम’ या नावानं ओळखला जातो. हा त्रास साठ वर्षांनंतरच्या पुरुषांना होण्याची जास्त शक्यता असते. याबद्दल आपल्याकडच्या सुश्रुतापासून ते व्हेसायलियस पर्यंत अनेक शस्त्रक्रियातज्ज्ञांनी लिहून ठेवलं आहे; पण या पोटातच फुगलेल्या धमनीची शस्त्रक्रिया कशी करायची याचं तंत्र विसावं शतक उजाडलं तरी अजूनही पूर्णपणे विकसित झालं नव्हतं. यात समस्या ही होती की धमनीचा फुगलेला भाग तर कापून टाकण्याशिवाय पर्याय नसतो; पण त्यातून तयार झालेली दोन टोकं रक्तपुरवठा थांबणार नाही अशाप्रकारे पुन्हा जोडणार कशी ?
काहीतरी करून दोन धमन्या जोडल्या तरी पुन्हा दोन समस्या येतात. पहिली म्हणजे त्या धमनीतून रक्तप्रवाहाला अडथळा व्हायला नको, दुसरी म्हणजे धमनी शिवली तर ती मध्येच कुठे तरी गळायला लागू नये अश्या प्रकारे शिवावी लागणार होती आणि तिसरी म्हणजे धमनीला टाके घातले तर धमनीच्या आतलं आवरण फाटून तिथे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा प्रश्न होता.
अलेक्सिस कॅरल नावाचा एक फ्रेंच सर्जन या समस्येवर सलग एक दशक काम करत होता. शेवटी १९०२ साली कसे टाके घातले तर धमनीची दोन टोकं एकमेकांना जोडता येतील याची एक वेगळीच पद्धत त्याला सुचली. धमनीचं उघडं वर्तुळाकार तोंड तीन ठिकाणी दाबून त्या वर्तुळाचा त्रिकोण कराययचा आणि मग ती दोन टोकं जोडायची. अर्थात हे इथं सांगितलं तितकं सोपं मुळीच नव्हतं. या पद्धतीला त्यानं ‘ट्रँग्यूलेशन’ असं नाव दिलं. या प्रकारच्या टाक्यानं अश्या शस्त्रक्रियांमध्ये क्रांती घडवून आणली आणि कॅरललाही १९३२ साली नोबेल पारितोषिक मिळवून दिलं.
याही प्रकाराला काही मर्यादा होत्या. रक्तवाहीनीचा मोठा तुकडा कापावा लागला तर मोकळ्या झालेल्या दोन टोकांमध्ये कोणतीतरी कृत्रिम नळी बसवावी लागणर. पण ती कशापासून बनवायची यावर पूर्वीपासून हस्तिदंत, काच, अॅल्यूमिनियम, चांदी अश्या पदार्थांच्या नळ्यांचे प्रयोग झाले होते. यातून रक्त गळून जात नव्हतं; पण हे पदार्थ लवचिक नव्हते त्यामुळे मध्येच रक्ताच्या गाठी व्हायची नवीनच समस्या यातून निर्माण झाली होती. त्यामुळे धमनीमधे पोलादी जाळी (स्टेंट) टाकण्याची पद्धत निघाली. शिवाय गरज असेल तिथे दुसऱ्या रक्तवाहिन्याही कापून बसवायला लागले होते. पण हे ऑपरेशन करायला १९४०-५०च्या दशकात ८ ते १० तास लागत असत. आणि इतका वेळ पोट उघडं राहिल्यामुळे त्यात जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण शस्त्रक्रिया अतिनिल किरणांमध्ये होत असे. त्यामुळे तितके तास शल्यविशारदही अतिनिल किरणांच्या संपर्कात येण्याचा धोकाही होताच.
या सगळ्याच समस्यांवर तोडगा निघेल असा एक प्रसंग १९५२ साली घडला आणि या प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या तंत्राच्या बाबतीत इतिहास घडला. न्यूयॉर्कमधल्या हॉस्पिटलमध्ये अश्याच एका पेशंटवर तातडीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. डॉ. ऑर्थर ब्लॅकमोर ही शस्त्रक्रिया करत होता. गरज ओळखून त्यानं आधीच एका नर्सला रक्तवाहिनीच्या बँकेतून रक्तवाहिनीचा एक तुकडा घेऊन यायला सांगितलं होतं. दोनच मिनिटात परत येऊन तिनं आपल्याकडेच काय; पण अख्ख्या न्यू-यॉर्कमध्ये एकही रक्तवाहिनीचा तुकडा नाहीये असं सांगितलं. यावर कोणताही डॉक्टर हताश झाला असता; पण तो फक्त म्हटला ‘ठीक आहे. आता आपल्याला तो तुकडा बनवावा लागेल’. डॉ. ब्लॅकमोरच्या या वाक्यानं त्याला सहाय्य करत असलेला त्याचा विद्यार्थी ऑर्थर व्हर्व्हिस याच्या डोक्यात वीज चमकावी तशी एक कल्पना आली.
“खरं म्हणजे व्हर्व्हिस गेली कित्येक वर्षं याच संधीची वाट पहात होता. दोन रक्तवाहिन्या कृत्रिमप्रकारे कशा जोडता येतील यावर त्यानं शेकडो प्रयोग केले होते. यासाठी लहानपणी कापडावर बारीक शिवण कशी घालायची हे शिकल्याचा खूप फायदा झाला ! त्यानं तंबूचं कापड, पॅरॅशूटचं कापड, बोटीच्या शिडाचं कापड अशा अनेक प्रकारच्या कापडांच्या कृत्रिम नळ्या तयार करुन कुत्र्यांच्या शरीरात बसवल्या आणि त्या कशा काम करतात ते पाहिलं होतं. पहिल्या काही प्रयोगांमधे कुत्र्यांचे बळी गेले; पण नंतर शिडाच्या कापडाची कृत्रिम नळी चांगली टिकते, काम करते आणि नंतर त्यावर पेशींचा नैसर्गिक थर तयार होतो म्हणजे शरीर त्या नळीला स्वीकारतं असंही त्याच्या लक्षात आलं होतं.” हा सगळा पट एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून गेला होता.
यानंतर क्षणाचाही विलंब न लावता व्हर्व्हिस आपल्या प्रयोगशाळेकडे धावला. त्यानं शिडाच्या कापडाची एक नळी शिवली, ती निर्जंतूक केली आणि तडक ऑपरेशन थिएटमधे नेऊन डॉ. ब्लॅकमोरच्या हवाली केली. ब्लॅकमोर आणि व्हर्व्हिस यांनी मिळून ती धमनी जोडली, पोट शिवलं आणि शस्त्रक्रिया पूर्ण केली. नंतर तो रुग्ण बरा झाला पण काही दिवसांनी तो हृदयविकाराच्या झटक्यानं वारला. तेव्हा शवविच्छेदन करुन पाहिलं असता व्हर्व्हिसची नळी आपलं काम चांगल्या प्रकारे करत असलेलं लक्षात आलं होतं. या शस्त्रक्रियेनं रक्तवाहिन्या जोडण्याच्या तंत्रात एक नवा अध्याय सुरु केला होता !