भाग – १५ मेंदूच्या शस्त्रक्रिया २

सायकॉसिस झालेले रुग्ण धोकादायक असतात. त्यांच्यावर कोणतेच उपचार चालत नसल्यामुळे ‌इगास मोनिझ यानं शोधलेली ‘व्हाइट कट’ सर्जरी उपयोगी पडते का? यावर बरेच लोक विचार करत होते. मेंदूच्या दोन भागांतल्या पांढऱ्या भागाला छिद्र पाडण्याची ही शस्त्रक्रिया होती.

अमेरिकेतल्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातला वॉल्टर फ्रीमन हा असाच एक अतिउत्साही न्युरोसर्जन होता. त्यानं सायकॉसिसवर उपाय म्हणून ही व्हाइट कट पद्धत वापरायचं ठरवलं. कॅन्सास राज्यातली मिसेस हॅमट नावाची महिला नैराश्यामुळे खूप आक्रमक व्हायची. त्यामुळे तिला वेड्यांच्या इस्पितळात ठेवायचं की तिच्यावर शस्त्रक्रिया करायची असे दोन पर्याय तिच्या नातेवाइकांसमोर होते. त्या वेळची वेड्यांची इस्पितळं तुरुंगांपेक्षाही भयानक असल्यानं तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे, तिच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. तिचं नैराश्य यानंतर बरंच कमी झालं. पण तिला बोलताच येईना आणि तिची स्मरणशक्तीही नष्ट झाली. हे बघितल्यावर सगळे घाबरले. पण काही काळानंतर तिला बोलता यायला लागलं आणि स्मृतीही परत आली. तिच्या आयुष्यातली सर्वाधिक आनंदाची पाच वर्षं तिच्या शस्त्रक्रियेनंतरची होती, असं फ्रीमननं आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय.

अमेरिकन सर्जन जेम्स वॉट्स हाही अशा प्रकारच्या सर्जरीज करत होता. फ्रीमन-वॉट्स या दोघांनी या सर्जरीचं नाव ‌‘ल्युकॉटॉमी’ हे बदलून ‌‘लोबोटॉमी’ केलं. मोनिझच्या शस्त्रक्रियेपेक्षा आपली पद्धत ‌‘वेगळी’ असल्याचं त्यांना दाखवायचं होतं. हॅमटच्या मेंदूवरच्या शस्त्रक्रियेच्या यशानंतर फ्रीमन वॉट्स द्वयीचा उत्साह वाढला आणि त्यांनी अतिशय बेजबाबदारपणे या शस्त्रक्रिया करायला सुरूवात केली. थोड्याच कालावधीत त्यांनी ६२३ शस्त्रक्रिया केल्या. त्यातल्या ५२% पूर्णपणे यशस्वी झाल्या; ३२% काही प्रमाणात यशस्वी झाल्या आणि १३% अयशस्वी झाल्या, असं जाहीर केलं. पण त्यांनी ज्या शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी म्हणून घोषित केल्या, त्याही खरंतर पूर्णपणे फसलेल्या होत्या; कारण त्यांतले कित्येक लोक एका जागीच बसून कुठेतरी शून्यात बघत असत. ते भावनाशून्य झाले होते. त्यांची स्मरणशक्ती खालावली होती. शिवाय त्यांना मदत करणाऱ्या नर्सेससोबत ते लैंगिक जवळीक करायचा प्रयत्न करत होते. थोडक्यात, त्यांचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून गेलं होतं आणि त्यांच्यातले कित्येक जण पूर्णपणे निर्जीव वस्तूसारखे झाले होते.

तरीही खोट्या यशाच्या धुंदीत फ्रीमन आणि वॉट्स यांनी मेंदूशस्त्रक्रिया करण्याचा सपाटा चालूच ठेवला. या सगळ्यांची त्यांनी खूप जाहिरातबाजीही केली. वैद्यकीय सभांमध्ये जाहिरात करण्यासाठी ते स्वत:चा चक्क स्टॉल लावत! आपल्या शस्त्रक्रियेमुळे कित्येक मनोविकार बरे होतात; अशा पत्रकार परिषदांमध्ये मुलाखती देत. अमेरिकेतल्या 33 राज्यांमध्ये त्यांनी मेंदूशस्त्रक्रिया करायचा धडाकाच चालवला होता.

फ्रीमननं 1945पर्यंत मेंदूवरची एकही शस्त्रक्रिया स्वत: केली नव्हती. १९४५मध्ये फ्रीमननं ट्रान्सऑरबिटल (डोळ्याच्या वरच्या भागातून मेंदूत आत जाणं) ही लोबोटॉमीची पद्धत प्रेतांवर प्रयोग करून विकसित करायचा प्रयत्न केला. यासाठी त्याला योग्य उपकरण सापडत नव्हतं. अखेरीस, त्याला बर्फ फोडायचं ‌‘आईस पिक’ हे उपकरण सापडलं. हे उपकरण वापरून त्यानं वॉट्सला न सांगता मेंदूची पहिली शस्त्रक्रिया केली. अशा दहाव्या सर्जरीनंतर त्यानं वॉट्सला ते सांगितलं. वॉट्स यामुळे खूप वैतागला. अशी शस्त्रक्रिया ही फक्त निष्णात न्युरोसर्जननंच करावी, अशा मताचा वॉट्स असल्यामुळे त्या दोघांची भागीदारी अखेर संपुष्टात आली.

प्रथम मोनिझ आणि नंतर फ्रीमन यांनी आपले मेंदूशस्त्रक्रियेचे यशस्वी निकाल जगासमोर सादर केले, तेव्हा लोकांमध्ये प्रचंड उत्साह पसरला. मोनिझची तर खूपच प्रशंसा झाली. त्याला अनेक ठिकाणांहून डॉक्टरेट पदव्या चालत आल्या. या प्रसिद्धीमुळे १९४९मध्ये मोनिझला लोबोटॉमीसाठी नोबेल पारितोषिक मिळालं. हे पोर्तुगालसाठी पहिलंच नोबेल होतं. मोनिझवर होत असलेला अभिनंदनाचा वर्षाव पाहून फ्रीमन वैतागला आणि त्यानं चेकाळून जास्तीतजास्त शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. त्यात अनेक रुग्ण दगावले. त्याच्या जाहिरातबाजीवर टीका होऊ लागली. तरीही नामवंत लोक त्याच्याकडे जायचे कमी झाले नाहीत. दहा वर्षांत त्यानं लोबोटॉमीच्या २४०० शस्त्रक्रिया केल्या. म्हणजे, दर आठवड्याला चार-पाच! १९४०च्या दशकात एकट्या अमेरिकेत ५०००० लोबोटॉमी झाल्या. वॉल्टर फ्रीमनबद्दल ‌‘स्वत:ला देवदूत समजून तो लोकांचे प्रीफ्राँटल लोब कापत सुटला आहे.’ असे उद्गार त्याचा समकालीन ओले एनर्सेन यानं काढले होते.

हळूहळू लोबोटॉमीचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात यायला सुरुवात झाली. आक्रमक, हिंसक मनोरूग्ण लोबोटॉमीनंतर शांत झाले. पण खरं म्हणजे त्यांची अवस्था जिवंत प्रेतांसारखी होत होती. बुद्धिभ्रंश होणं, स्वत:वरचा ताबा सुटणं, फेफरं हे लोबोटॉमीचे दुष्परिणाम अनेक रुग्णांमध्ये दिसायला लागले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची बहीण, लेखक टेनेसी विल्यम्स याची बहीण हे लोबोटॉमीला बळी पडलेले काही नामवंत होते. रॉबर्ट वॉरेननं लिहिलेल्या ‌‘ऑल द किंग्ज मेन’ या १९४६मधल्या नाटकातला सर्जन हा खुनशी प्रवृत्तीचा असतो. ‌‘माणसांना प्रेमानं बदलवण्याऐवजी सुरीनं जरा चांगलं सुतारकाम (लोबोटॉमी) करून त्यांचं आयुष्य बदलावं’ अशी वाक्यं त्याच्या तोंडी येतात. १९५८ मधलं टेनेसी विल्यम्सचं ‌‘द लास्ट समर’ हे नाटक त्याच्या बहिणीच्या लोबोटॉमीवर आधारित होतं. या नाटकात खरं बोलण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यातल्या नायिकेला ‌‘नाहीतर तुझी लोबोटॉमी करू’ अशा धमक्या देतात. सिल्व्हिया प्लाथच्या ‌‘बेल जार’ या कादंबरीत व्हॅलेरीवर लोबोटॉमी झालेली असते. त्यात ती निर्जीव वाटावी इतकी शांत असते असं वर्णन आहे.

या प्रकारामुळे मग मोनिझचं नोबेल पारितोषिक वादाच्या भोवऱ्यात सापडलं. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये लोबोटॉमीविरुद्ध चळवळी सुरू झाल्या. मोनिझचा समकालीन टॉर्स्टेन विझेल या दुसऱ्या नोबेल पारितोषिकविजेत्यानं ‌‘मोनिझला दिलं गेलेलं नोबेल ही एक भयंकर चूक आहे’ असं मत मांडलं होतं. हजारो रुग्ण लोबोटॉमीमुळे आयुष्यातून उठले. लोबोटॉमीला सामोरे गेलेल्या काही पेशंट्सनी विशेषत: त्यांच्या मुलांनी या विषयावर तोंड उघडलं. मोनिझला दिलेलं नोबेल परत घ्यावं अशी मागणी करण्यासाठी अनेक लोकांनी एक चळवळच सुरू केली. बेंड जॅन्सन या मानसोपचारतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिकविजेत्यानं मात्र १९४०मध्ये जे काही घडलं त्यात त्याला काही चूक वाटत नाही, त्यावेळी दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता असं मान्य केलं. हा वाद अजून चालूच आहे!

१९४०नंतर अनेक देशांत लोबोटॉमीवर बंदी घातली होती. मधल्या काळात लोबोटॉमी मनोविकार बरा करण्याकरता न वापरता राजकीय प्रतिस्पर्ध्यासाठी वैरभावानं वापरली गेली होती. त्यात १९७५मध्ये ‌‘वन फ्लू ओव्हर द ककूज नेस्ट’ हा सिनेमा आला. केन केसी या त्याच्या लेखकाला या कादंबरीसाठी पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. यातल्या मॅकर्फी नावाच्या रुग्णाला शिक्षा म्हणून त्याच्यावर लोबोटॉमी करून त्याची अवस्था जिवंत प्रेतासारखी केली जाते. या सिनेमाचा जनमानसावर इतका प्रचंड परिणाम झाला, की लोबोटॉमी त्यानंतर इतिहासजमाच झाली !

Scroll to Top