मेंदूला शरीरातल्या सर्व अवयवांमधे खूपच महत्त्व असल्यामुळे प्राचीन काळापासूनच मेंदूवरचे उपचार, मेंदूवरच्या शस्त्रक्रियेची हत्यारं अशा गोष्टी सापडतात. फ्रान्समधे मेंदूवरच्या शस्त्रक्रियांच्या उपकरणांचे पुरातन काळातले अवशेष सापडले आहेतच. इंका संस्कृतीमध्येही ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांदरम्यान मेंदूवर शस्त्रक्रिया व्हायच्या. त्या काळी मनोविकार, फेफरं, डोकेदुखी यांच्यावर उपचार म्हणून मेंदूची शस्त्रक्रिया करत. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठीची प्राचीन काळातली ब्राँझची आणि ऑब्सिडियन नावाच्या दगडापासून बनवलेली हत्यारं सापडली आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया घातलेल्या हिप्पोक्रेट्सनं ख्रिस्तपूर्व चौथ्या-पाचव्या शतकात मेंदूच्या शस्त्रक्रियेसंबंधी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात रोममध्ये ऑलस कॉर्नेलिअस सेल्सस हा बुद्धिमान सर्जन नैराश्यग्रस्त रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करत असे. आशिया खंडात टर्कीमधे गॅलेन ऑफ परगॅमन, एजिना मधला पॉल हे मेंदूशल्यचिकित्सक होते.
मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या काळात वेडेपणासारख्या मनोविकारांवर‘ट्रेपानिंग’ ही पद्धत वापरत. या पद्धतीत कवटीला अणकुचीदार दगडानं छिद्र पाडत. वेडेपणाला कारणीभूत असलेल्या दुष्ट शक्ती आणि वाईट विचार या छिद्रातून पळून जातील, अशी चमत्कारिक कल्पना यामागे होती. मनोविकारांचं कारण असलेला मेंदूचा बिघडलेला भाग काढून टाकणं, हा त्या शस्त्रक्रियेमागचा हेतू असे. आजही एखाद्या रोगग्रस्त अवयवामुळे रोग जर बाकीच्या शरीरात पसरत असेल, तर तेवढा भाग काढून टाकतात. पूर्वीही मनोविकारांचा ताबा मेंदूतल्या फ्राँटल लोबमध्ये असतो असं समजून, त्या काळी फ्राँटल लोबच काढून टाकत असत.
मेंदूची शस्त्रक्रिया वेगवेगळ्या विकारांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते. कित्येकदा मानसिक रुग्ण हिंसक आणि आक्रमक होतात. त्यांना काबूत आणण्यासाठी मेंदूतल्या प्री-फ्राँटल कॉर्टेक्सपासून फ्राँटल लोबकडे जाणारी जोडणी कापतात. याला ‘ल्युकॉटॉमी’ किंवा ‘लोबोटॉमी’ म्हणतात. आज, मनोविकारांवर दुसरा कोणताही उपाय चालत नाही असं वाटलं, तरच ‘लोबोटॉमी’ करायचा निर्णय घेतात. १८९१ ते १९१० या दरम्यान काही न्युरॉलॉजिस्ट्सनी नैराश्यग्रस्त रुग्णांवर ल्युकॉटॉमी केली. पण तेव्हा त्याकडे कोणाचंच फारसं लक्ष गेलं नाही. १९३५ मध्ये इगास मोनिझ या न्युरॉलॉजिस्टनं त्याचा सहकारी अल्मेडा लिमा याच्या मदतीनं पहिली ल्युकॉटॉमी केली. तेव्हा मात्र ही पद्धत एकदम प्रसिद्ध झाली!
इगास मोनिझ हा पोर्तुगीज न्युरॉलॉजिस्ट होता. १९११ मध्ये स्थापन झालेल्या लिस्बन विद्यापीठात तो न्युरॉलॉजीचा प्राध्यापक होता. मोनिझ हा अतिशय चतुर, मुत्सद्दी आणि खासदार देखील होता. १९२०मध्ये राजकारणाला रामराम ठोकून त्यानं वैद्यकशास्त्र आणि लेखन यांमध्ये आयुष्य वाहून घ्यायचं ठरवलं आणि ‘उत्कृष्ट मेंदूविकारतज्ज्ञ’ म्हणून त्यानं जगभर नाव कमावलं. हिप्नॉटिझम आणि त्याचा इतिहास, युद्धामुळे होणारे मेंदूचे विकार, याचबरोबर लैंगिकता अशा बऱ्याच गोष्टींवरही त्यानं अनेक पुस्तकं लिहिली. मग १९२७मध्ये त्यानं सेरेब्रल अँजिओग्राफीचा शोध लावला. मोनिझच्या अगोदर मेंदूमध्ये चालणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी लोक क्ष किरणांचा वापर करत. पण असा क्ष किरणांचा दीर्घकाळ वापर करणं धोक्याचं होतंच, शिवाय त्यातून मिळणाऱ्या प्रतिमा धूसर दिसायच्या. डॉक्टरांनी मग यावर एक उपाय करून पाहिला. तो म्हणजे डोक्यात इंजेक्शननं चक्क हवा भरायची. याला ‘एअर एन्स्फॅलोग्राफी’ असं म्हणतात. पण याही पद्धतीनं मेंदूची स्पष्ट प्रतिमा मिळत नव्हती. त्यामुळे उलट डोकेदुखीच व्हायची.
यानंतर मोनिझनं इतर रसायनांबरोबर सोडिअम आयोडिनचं द्रावण मृत शरीरात ? इंजेक्ट करायला सुरुवात केली. यामुळे मेंदूतल्या रोहिण्यांचा नकाशा जास्त स्पष्ट दिसायला लागला. जेव्हा मेंदूत गाठ येते, तेव्हा या रोहिण्यांची जागा बदलल्यामुळे मेंदूचा नकाशा वेगळा दिसतो आणि त्यामुळे ट्युमर ओळखता येतो. या कारणामुळे मोनिझची ही सेरेब्रल अँजिओग्राफीची पद्धत लोकप्रिय झाली. या पद्धतीमुळे मेंदूची शस्त्रक्रिया किती लवकर करणं आवश्यक आहे हा निर्णय घेता येतो. या शोधाबद्दल त्याला अनेक मानसन्मान लाभले, तसंच त्याची दोन वेळा नोबेल पारितोषिकासाठीही शिफारस झाली. पण तेव्हा त्याला नोबेल पारितोषिक मिळालंच नाही. शेवटी ते एका भलत्याच वादग्रस्त कारणासाठी मिळालं!
१९३५मध्ये लंडनला भरलेल्या न्युरॉलॉजीच्या परिषदेत जेकबसन आणि फुल्टन या न्युरॉलॉजिस्टमंडळींनी एक अहवाल सादर केला. दोन चिंपांझींवर ल्यूकॉटॉमी केल्यानं त्या चिंपांझींचं आक्रमक वागणं कसं बदललं आणि तरीही त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम कसे झाले नाहीत, याविषयी त्या अहवालात लिहिलं होतं. आधी खूप आक्रमक असलेली माकडं अशा शस्त्रक्रियांनंतर एकदम मवाळ झाल्याची वर्णनंही मोनिझनं सांगितली. यामुळे प्रभावित होऊन स्किझोफ्रेनिया, तीव्र नैराश्य आणि पॅरॉनॉइया हे विकार असलेले मनोरुग्ण जेव्हा त्याच्याकडे यायचे, तेव्हा त्यांच्या मेंदूवर त्यानं शस्त्रक्रिया करायला सुरूवात केली.
मोनिझनं १२ नोव्हेंबर १९३५ रोजी एका पॅरॉनॉइड स्त्रीवर पहिली शस्त्रक्रिया केली. तिला भूल देऊन कवटीला भोक पाडून मेंदूमध्ये जिथे फ्राँटल लोब आणि मेंदूचे इतर भाग जोडले जातात, तिथे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर ती स्त्री थोडी मवाळ झाली आणि तिच्या वागणुकीत सुधारणा दिसायला लागली. मोनिझनं मग अल्मेडा लिमा या सहकाऱ्यासोबत आणखी २० शस्त्रक्रिया केल्या आणि त्या यशस्वी ठरल्याचा दावाही केला. प्रत्यक्षात तो दावा तितकासा खरा नसला तरी मोनिझला मात्र यानंतर उत्साह आला. अल्कोहोलमुळे होणारा परिणाम सौम्य आहे; त्याऐवजी मेंदूमध्ये चक्क सुरी खुपसून काही विशिष्ट भाग काढून टाकावा, म्हणजे हे मनोविकार बरे होतील असं त्याला वाटायला लागलं. यासाठी त्यानं मेंदूच्या दोन भागांमधल्या पांढऱ्या भागाला छिद्रं पाडण्यासाठी एक नवीन साधन बनवलं. मोनिझच्या या शस्त्रक्रियेला त्यामुळे ‘द व्हाइट कट’ असं नाव पडलं. साधारण ४०-५० पेशंट्सवर अशा ल्युकॉटॉमीच्या शस्त्रक्रिया करून त्या साध्या, सुरक्षित आणि अतिशय उपयोगी असल्याचा दावा मोनिझनं केला. त्याचा समकालीन बेंड जॅन्सन या मानसोपचारतज्ज्ञानं ‘मोनिझ स्वत: सर्जरी शिकलेला नव्हता. बऱ्याचदा त्याला असलेल्या गाऊट या रोगामुळे त्याचे हात सर्जरी करताना थरथरत असल्यामुळे तो स्वत: सर्जरी करत नसे’ असं लिहून ठेवलंय. तरीही ल्युकॉटॉमीचा जनक आणि तिचा प्रसार करणारा म्हणून नि:संशयपणे मोनिझचंच नाव घेतलं जातं. केवळ चाळीस एक पेशंट्सवर प्रायोगिक तत्त्वावर ही शस्त्रक्रिया केल्यानंतर ल्युकॉटॉमी अवघ्या काही दिवसांतच जगभर वापरली जायला लागली. वैद्यकीय विश्वात एखादी गोष्ट इतक्या लवकर स्वीकारली जाण्याचा हा दुर्मीळ प्रकार आहे.
इकडे मोनिझच्या आयुष्यानं मात्र एक वेगळंच वळण घेतलं. १९३९मध्ये मोनिझला त्याच्यावर राग असलेल्या एका पेशंटनं गोळी घातली. यानंतर तो आयुष्यभर व्हीलचेअरला जखडला. १९५५मध्ये मोनिझचा मृत्यू झाला, तेव्हा लोबोटॉमी उतरणीस लागली होती.