भाग – १३ मेंदू – ब्रोका आणि वर्निके – २

पॅरिसमधल्या ‌‘बिसेट्रे’ इस्पितळात 1861 साली डॉ. ब्रोकाकडे लोबोर्ने नावाचा 51 वर्षांचा एक रुग्ण आला. त्याला बोलताच येत नव्हतं. तो फक्त ‌‘टॅन’ एवढाच शब्द म्हणू शकायचा. म्हणून त्याचं नावही ‌‘टॅन’ असंच पडलं होतं. टॅन पूर्वी नीट बोलू शकायचा; पण त्यानंतर फेफरं आल्यामुळे तो एकदा पडला आणि त्यानंतर त्याची वाचा गेल्यामुळे त्या इस्पितळात तो 21 वर्षांपूर्वी दाखल झाला हेाता. ब्रोकानं त्याला तपासलं; पण त्यावर काहीच उपचार न होऊ शकल्यामुळे सहा दिवसांतच तो मरण पावला. टॅनचा मृत्यू झाल्यावर 27 तासांत ब्रोकानं त्याचं शवविच्छेदन केलं. टॅनच्या मेंदूच्या फ्राँटल लोबच्या डाव्या बाजूला दुखापत झाली असल्याचं ब्रोकाच्या लक्षात आलं. भाषेमध्ये त्रास होत असणाऱ्या या आणि यानंतरच्या अनेक रूग्णांच्या अभ्यासानंतर, ‌‘भाषेसाठी मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागातला फ्राँटल लोब महत्त्वाचा असतो’, हे संशोधकांच्या लक्षात आलं.

‌‘बोलणं’ म्हणजे फक्त ‌‘शब्द उच्चारणं’ नव्हे. मनात विचार करणं, त्याप्रमाणे शब्द आणि वाक्य यांची मनात जुळवणीकरून मग ते उच्चारणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात. थोडक्यात, लिहिलेला शब्द वाचणं, शब्द ऐकणं, शब्द उच्चारणं आणि शब्द लिहिणं या सगळ्या गोष्टी भाषाज्ञानात अध्याहृत असतात, हे ब्रोकाला माहीत होतं. या सगळ्या गोष्टींसाठी मेंदूमध्ये वेगवेगळी केंद्रं असली पाहिजेत, असं ब्रोकाला वाटायला लागलं होतं. पण हे शोधून आणि तपासून बघण्याची गरज होती.

हे तपासण्याची एक संधी ब्रोकाला चालून आली. त्या काळात पॅरिसमध्ये राहणारी एक बाई मरण पावली. सुशिक्षित असूनही तिला अनेक वर्षं वाचता येत नसे, पण ती बोलू मात्र शकत असे. ती मेल्यावर ब्रोकानं तिच्या मेंदूचं विच्छेदन करून तपासलं. त्याला तिच्या मेंदूतल्या वाचेच्या केंद्राजवळच्या एका भागामध्ये दुखापत झाल्याचं आढळलं. यावरून हा दुखापत झालेला मेंदूचा भाग म्हणजे मेंदूतलं वाचनाचं केंद्र असलं पाहिजे हे ब्रोकानं लगेच ताडलं. टॅनमुळे ब्रोकाला मेंदूतलं वाचेचं केंद्र कळलं होतं. आता या बाईमुळे मेंदूतलं वाचण्यासाठीचं केंद्रही समजलं होतं. अशाच तऱ्हेनं भाषेची सगळी केंद्रं लक्षात आली. यांनाच ‌‘ब्रोकाज एरिया’ असं म्हणायला लागले. या संशोधनामुळे ब्रोका रातोरात प्रसिद्ध झाला.

पूर्वीपासून डॉक्टर्स बोलता न येण्याला ‌‘ॲफाशिया’ म्हणत असत. पण ज्याला भाषा पूर्णपणे कळत असूनही बोलता येत नाही, त्याला मग ‌‘ब्रोकाज ॲफाशिया’ किंवा ‌‘एक्स्प्रेसिव्ह ॲफाशिया’ असं म्हणायला लागले. अशी माणसं एक तर बोलूच शकत नाहीत किंवा बोललीच, तर एखाद्दुसरा शब्द तुटकतुटकपणे बोलतात. पण ब्रोकाज एरिया हा फक्त स्वरयंत्रातून आवाज काढणं नियंत्रित करत नाही, तर भाषेच्या व्याकरणाशीसुद्धा त्याचा संबंध असतो. उदाहरणार्थ, ‌‘मुलानं मुलीकडून मार खाल्ला’ असं पॅसिव्ह वाक्य असेल तर ब्रोकाज ॲफाशिया झालेले रुग्ण ‌‘मुलानं मुलीला मार दिला’ असाच अर्थ घेतील.

यानंतर एक विलक्षण गोष्ट घडली. प्रो. सेसिल हँडोव्हर या इंग्रजीच्या एका प्राध्यापकाचं फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि इंग्रजी या सर्व भाषांवर प्रभुत्व होतं. एके दिवशी हँडोव्हरला अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. काही काळ उपचार आणि विश्रांती घेतल्यावर त्यानं सहज म्हणून इंग्रजीतलं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तक उघडल्याबरोबर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला एक अक्षरही वाचता येईना ! आपली वाचण्याची शक्ती नष्ट झालीय, असंच त्याला वाटलं. त्यानं काही दिवस निराश होऊन काहीही वाचण्याचा नादच सोडून दिला, पण एके दिवशी त्याच्या हातात ग्रीक भाषेतलं ॲरिस्टॉटलचं ‌‘पोएटिक्स’ हे पुस्तक पडलं. त्यानं ते उघडलं, तेव्हा त्याला ते सरळ, धडाधड वाचता आलं ! त्यानं पुन्हा दुसरं एक इंग्रजीतलं पुस्तक उघडलं तेव्हा पुन्हा त्याला काहीच वाचता येईना. त्यांनी त्याला लॅटिन आणि फ्रेंच भाषेतली एकएक पुस्तकं दिली. आश्चर्य म्हणजे, ती त्याला वाचता आली ! आता मात्र डॉक्टरांच्या डोक्यात ट्यूब पेटली. आपल्या मेंदूत फक्त भाषेसाठी लिहिण्या, वाचण्या, ऐकण्याची वेगवेगळी केंद्रं असतात एवढंच नाही; तर त्यातही प्रत्येक भाषेसाठीही पुन्हा वेगवेगळी केंद्रं असतात हाच निष्कर्ष या सगळ्यांतून निघत होता. डॉ. हँडोव्हरच्या मेंदूतल्या फक्त इंग्रजीच्या केंद्राला धक्का पोहोचला होता !

कालांतरानं फ्रान्समध्ये राजकीय परिवर्तन झालं आणि ब्रोका चक्क एक सीनेटर बनला. तो एक उत्कृष्ट वक्ता होता. पण नशीब बघा ! यानंतर लगेचच 1880 साली ब्रोका मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मरण पावला ! आश्चर्य म्हणजे याच गोष्टीवर त्यानं प्रचंड संशोधन करून त्याआधी 20 वर्षांपूर्वी एक 900 पानी पुस्तकही लिहिलं होतं ! पॅरिसमधल्या ‌‘म्युझियम ऑफ मॅन’मध्ये ब्रोकाच्या मेंदूची प्रतिकृती ठेवण्यात आलीय.

भाषेविषयी मेंदूतला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ‌‘वर्निकेज एरिया’. वर्निके या जर्मन न्युरॉलॉजिस्टकडे एक रुग्ण आला होता. तो व्यवस्थितपणे बोलू शके. पण त्याला दुसऱ्यांचं बोलणंच कळत नसे. तो रुग्ण मरण पावल्यानंतर वर्निकेनं त्याचं शवविच्छेदन केलं, तेव्हा त्याला ऑडिटरी कॉर्टेक्सच्या मागे असलेल्या टेम्पोरल लोबच्या वरच्या भागामध्ये बिघाड झालेला आढळला. यामुळे दुसऱ्यांचं बोलणं समजण्याच्या प्रक्रियेवर हा भाग नियंत्रण ठेवत असला पाहिजे, असं त्याच्या लक्षात आलं. तेव्हापासून मेंदूच्या त्या भागाला ‌‘वर्निकेज एरिया’ असं म्हणायला लागले.

त्या काळापासूनच, ‌‘ज्यांना बोलता येतंय; पण दुसऱ्यांचं म्हणणं कळत नाही’ अशा विकाराला ‌‘वर्निकेज ॲफाशिया’ किंवा ‌‘रिसेप्टिव्ह ॲफाशिया’ म्हणतात. जर तुम्ही अशा रुग्णांना काही प्रश्न विचाराल, तर त्यांच्या उत्तरातलं व्याकरण बरोबर असेल; पण उच्चारलेलं वाक्य बऱ्याचदा निरर्थक आणि शब्दांची खिचडी करून केलेलं असेल. याला ‌‘वर्ड सॅलड’ असं संबोधलं जातं. ‌‘ब्रोकाज एरिया’प्रमाणे, वर्निकेज एरियाचा संबंध दुसऱ्यांचं म्हणणं समजून घेण्याइतका मर्यादित नसतो.

ब्रोका आणि वर्निके यांचे भाग मेंदूतल्या वेगवेगळ्या लोब्जमध्ये जरी असतील तरी ते एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि ते आर्क्युएट फॅसिलिकसनं एकमेकांना जोडलेले असतात. या जोडणीमध्ये काही इजा पोहोचल्यास जो विकार होतो त्याला ‌‘कंडक्शन ॲफाशिया’ असं म्हणतात. हे रुग्ण ब्रोकाज ॲफाशिया आणि वर्निकेज ॲफाशिया यांच्यापेक्षा किंचित बऱ्या स्थितीत असतात. त्यांना दुसऱ्यांचं बोलणं कळतं आणि ते त्याला सुसंबद्धपणे उत्तरही देऊ शकतात; पण ते करायला त्यांना वेळ आणि कष्ट दोन्हीही जास्त लागतात. तसंच दुसऱ्यांचं ऐकलेलं पुन्हा त्यांना तसंच सांगता येत नाही.

Scroll to Top