मेंदूविषयीचं आपलं ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं. ते ज्ञान मिळवताना त्यात कित्येक वादविवाद घडलेले आहेत, तर कित्येक प्रयोग आणि काही अपघातही ! अमेरिकेमध्ये न्यू इंग्लंड या राज्यात 150 वर्षांपूर्वी एका रेल्वे अपघातामुळे आपल्या मेंदूच्या ज्ञानामध्ये एवढी भर पडेल असं कोणालाही वाटलं नसतं !
13 सप्टेंबर 1848 रोजी दुपारी अमेरिकेतल्या व्हर्मेांटमधल्या कॅव्हेंडिशपासून पाऊण मैलावर रेल्वेची लाइन टाकण्याचं काम चालू होतं. फिनिआज गेज हा अत्यंत कष्टाळू माणूस त्याचं नेतृत्व करीत होता. या कामात डोंगरातून वाट तयार करण्याकरता त्यांना स्फोटकं वापरावी लागत होती. एके दिवशी काम करताना त्यातलंच एक स्फोटक विचित्र तऱ्हेनं फुटून सात किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या डाव्या गालातून घुसून त्याच्या मेंदूला आणि कवटीला भोक पाडून डोक्यातून चक्क वर आला. कवटीला एवढं मोठं भोक पडलं होतं, की त्यातून एखाद्याची मूठसुद्धा आत जाईल !
या स्फोटानंतर गेज अनेक यार्ड दूर एका खड्ड्यात जाऊन आदळला. बऱ्याच वेळापर्यंत गेज तिथेच विव्हळत पडला होता. ख्रिस्तोफर गुडरीच या माणसानं त्याला आपल्या बैलगाडीत घालून गावातल्या जोसेफ ॲडॅमच्या लॉजवरती नेऊन ठेवलं. गेज जगण्याची आता कोणालाच आशा वाटत नव्हती. त्यामुळे मृतांसाठीच्या शवपेट्या तयार करणारा थॉमस विन्स्लो या माणसानं गेज जिवंत असताना त्याच्यासाठी शवपेटी करण्यासाठी चक्क त्याच्या शरीराची मोजमापंही करून नेली !
पण गेजच्या नशिबानं एडवर्ड विल्यम्स आणि जॉन हार्लो या दोन डॉक्टरांनी त्याच्या जखमांवर त्या वेळच्या कुठल्याशा औषधांचा मारा केला. आश्चर्य म्हणजे, गेज चक्क बरा होऊन न्यू हॅम्शायरमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे विश्रांतीसाठी परतला ! डॉक्टर हार्लोनं ‘बॉस्टन मेडिकल अँड सर्जिकल जर्नल’मध्ये याविषयी एक लेख लिहिला. असा लोखंडी दांडा डोक्यातून जाऊनसुद्धा गेज हा कसा व्यवस्थित बोलतोय-चालतोय, त्याचे हातपाय मुक्तपणे कसे हालवू शकतोय आणि त्याच्या संवेदनाही कशा नॉर्मल आहेत, याविषयी त्या लेखात लिहिलं होतं. हे वाचणाऱ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटंच घातली !
गेजची ही गोष्ट पुढची अनेक दशकं गाजली. या गोष्टीचा उल्लेख मज्जाविज्ञानावरच्या बहुतांशी सर्व पुस्तकांत झाला. पण गेज आता पूर्वीचा गेज राहिला नव्हता. शांत, नीटनेटका आणि धीरगंभीर गेज आता चिडचिडा आणि आक्रमक झाला होता. त्याच्या सुस्वभावी आणि मनमिळाऊ स्वभावाचं रूपांतर आता हट्टी आणि अहंकारी स्वभावात झालं होतं. एवढंच नाही; तर एके काळचा लाजाळू गेज आता कोणाकडेही आपली लैंगिक इच्छा व्यक्त करे. या सगळ्यांमुळे त्याची पूर्वीची नोकरीही गेली आणि तो आयुष्यात भरकटला. सफाई कामगार, कोचमन, वेटर, तबेल्यात घोड्यांची निगा राखणारा सेवक आणि काही काळ तर चक्क न्यूयॉर्कच्या बार्नमच्या सर्कशीत अशी त्यानं चित्रविचित्र कामं केली. पण हळूहळू त्याची प्रकृती खालावली. त्याला सतत फेफरं यायला लागली आणि 1860 साली शेवटी त्याचा मृत्यू झाला. 1867 साली त्याचं शरीर पुन्हा उकरून त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि डॉक्टर हार्लोनंच गेजची भोक पडलेली कवटी आणि तो कुप्रसिद्ध लोखंडी दांडा हे हार्वर्डमधल्या मेडिकल स्कूलला भेट दिलं. अजूनही ‘काउंट वे लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं.
या अपघातामुळे एक मात्र झालं. आपल्या स्वभावातल्या वेगवेगळ्या पैलूंसाठी आणि आपण करत असलेल्या निरनिराळ्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूत वेगवेगळे भाग असतात की नाही, यावर आता खूप संशोधन, चर्चा, वाद आणि एकूणच मेंदूविज्ञानाचा सखोल अभ्यास सुरू झाला. हा अभ्यास करणाऱ्यांमध्ये पॉल प्येर ब्रोका (1824-1880) हा एक शरीरशास्त्रज्ञ, सर्जन, मानववंशशास्त्रज्ञ आणि एक महत्त्वाचा संशोधक अग्रस्थानी होता. तोच ‘मेंदूच्या आधुनिक शस्त्रक्रियेचा पितामह’ समजला जातो. त्यानं शस्त्रक्रियेची वेगवेगळी उपकरणं शोधून काढली. तसंच त्यानं गणित, भौतिकशास्त्र आणि साहित्य यांतही पदव्या मिळवल्या होत्या. बुद्धिमान ब्रोका तितकाच सहृदयीसुद्धा होता. गरिबांना आरोग्यसेवा स्वस्तात कशी मिळेल यासाठी तो झटे. एकदा एके ठिकाणी 7.3 कोटी फ्रँक्सची लूटमार होणार होती. हे कळताच स्वत: जोखीम उचलून त्यानं ते पैसे रातोरात पॅरिसमधून दुसरीकडे नेऊन पोहोचवले होते ! कार्ल सेगननं लिहिलेल्या ‘ब्रोकाज ब्रेन’ या पुस्तकात ब्रोकाविषयी झकास लिहिलंय.
1848 साली त्यानं मुक्त विचार करणाऱ्यांची ‘फ्री थिंकर्स’ नावाची एक सोसायटी स्थापन केली. त्याच्या सगळ्या विचारांमुळे सॉक्रेटिसप्रमाणेच लहान मुलांची मनं बिघडवण्याचा त्याच्यावर फ्रान्समध्ये आरोप झाला होता. ब्रोकानं जेव्हा मानववंशशास्त्राच्या संशोधनासाठी आणि चर्चेसाठी एक सोसायटी स्थापन करण्यासाठी परवानगी मागितली, तेव्हा अशी सोसायटी समाजाला आणि फ्रेंच राज्याला घातक असल्याचं मत तिथल्या पोलिसांनी दिलं. ब्रोकाच्या अविरत प्रयत्नांनी शेवटी ती परवानगी मिळाली; पण तरीही त्या काळी ब्रोका इतका घातक समजला जायचा की त्याच्या सभांना साध्या गणवेशातली सीआयडीची मंडळीही हजर असायची ! ब्रोकाच्या सभांमध्ये पुराणकथा, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास वगैरे गोष्टींवर चर्चा सुरू व्हायची. ते ऐकताना कोपऱ्यात बसलेला तो गुप्तहेर चक्क घोरायचा ! एकदा कंटाळून ही सभा चालू असतानाच थोडं बाहेर फिरून येण्याची ‘परवानगी’ त्या गुप्तहेरानंच उलट ब्रोकाकडे मागितली आणि त्याच्या गैरहजेरीत काहीही प्रक्षोभक न बोलण्याची त्यानं ब्रोकाला विनंती केली. पण ब्रोकानं उलट त्यालाच दम भरला. त्यानं त्याचं काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि तिथून जाता कामा नये, असाही त्याला ब्रोकानं सल्ला दिला !
4 एप्रिल 1861 रोजी ब्रोकानं अर्नेस्ट ऑबर्टिन या गॉलच्या फ्रेनॉलॉजीच्या विद्यार्थ्याचं भाषण ॲन्थ्रॉपॉलॉजी सोसायटीमध्ये ऐकलं आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. यानंतर ब्रोकानं अनेक चित्रविचित्र प्रयोग करायला सुरुवात केली. आपण वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमध्ये (राग, आनंद, नैराश्य…) असताना आपल्या मेंदूचं तपमान किती आहे, हे त्याला बघायचं होतं. यासाठी तो आपल्या विद्यार्थ्यांपैकीच काहीजणांची ते वेगवेगळ्या मन:स्थितीत असताना त्यांच्या डोक्याची तापमानं घेई आणि ती नोंदवून ठेवी. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणारं केंद्र आपल्या मेंदूच्या पुढच्या भागात असतं, याची ब्रोकाला खात्री पटली होती. त्यावर आणखी संशोधन करण्यासाठी, ज्याच्या बोलण्यात खूप दोष निर्माण झालेल्या माणसांच्या शोधात ब्रोका होता. लवकरच त्याला तीही संधी मिळाली.
(पूर्वार्ध)