भाग – ११ पहिलं प्रतिजैविक

अनेक प्रयोगांमधून त्याला जे काही सापडलं त्याला त्यानं तेव्हा ‘मोल्ड ज्यूस’ असं नाव दिलं होतं. पण नंतर तो त्याबद्दल म्हणतो, “२८ सप्टेंबर १९२८ या दिवशी मी उठलो तेव्हा नक्कीच औषधांच्या जगामध्ये क्रांती वगैरे करण्याचा असा काही विचार नव्हता; पण माणसाच्या शरीराला संसर्ग करणाऱ्या जिवाणूंना मारणाऱ्या औषधाच्या (प्रतिजैविक – अँटिबायोटिक) शोधामुळे झालं मात्र तसंच!” – अलेक्झांडर फ्लेमिंग

अलेक्झांडर फ्लेमिंगनं पेनिसिलिन या पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला आणि खरोखर वैद्यकीय जगामध्ये क्रांती घडवून आणली. या शोधामुळे अक्षरशः अगणित लोकांचे प्राण तर वाचलेच; पण त्यामुळे अँटिबायोटिक्स या स्वतंत्र प्रकारच्या औषधांचा खूप महत्वाचा प्रकार निर्माण झाला. याशिवाय स्वतः अलेक्झांडर फ्लेमिंग याला या शोधामुळे अनेक पुरस्कार मिळाले, तीस वेगवेगळ्या विद्यापीठांमधून सन्माननीय पदव्या मिळाल्या, लंडनच्या रॉयल सोसायटीचं सभासदत्व मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच शोधासाठी त्याला शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्र या शाखेतलं नोबेल पारितोषिकही मिळालं. ‘टाईम’ या जगप्रसिद्ध मासिकानं त्याची विसाव्या शतकातल्या १०० अत्यंत महत्वाच्या लोकांच्या यादीत त्याचा समावेश केला. पण गंमत म्हणजे फ्लेमिंगला मुळात वैज्ञानिक व्हायचंच नव्हतं !

६ ऑगस्ट १८८१ या दिवशी स्कॉटलंडमधल्या लेकफिल्डमध्ये फ्लेमिंगचा जन्म झाला. त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडीलांचं वय ६० वर्षं होतं. आणखी ७ वर्षांनी त्याचे वडीलच वारले आणि फ्लेमिंगला आपल्या भावंडांसहित लंडनला स्थलांतरित व्हावं लागलं. सुदैवानं त्याच्या एका काकानं मृत्यूनंतर आपली काही संपत्ती फ्लेमिंगला दिली असल्यानं त्याच्या शिक्षणासाठी त्याला पैसे मिळाले. त्याच पैश्यातून त्यानं लंडन विद्यापीठाच्या सेंट मेरीज मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी मिळवली. आणि तो स्थानिक सैनिकी संस्थेमध्ये मेडिकल ऑफिसरचं काम करायला लागला. तिथे तो चांगलाच रुळला पण जेव्हा फ्लेमिंगला पदव्युत्तर शिक्षण घ्यायची वेळ आली तेव्हा त्याला स्वतःला शस्त्रक्रियेमध्ये पदवी घ्यायची होती. पण सध्या काम करत असलेल्या सैनिकी संस्थेमधला कॅप्टन त्याला शस्त्रक्रिया शिकायला जाऊ देईना. थोडक्यात शस्त्रक्रिया शिकण्यासाठी त्याला सैनिकी संस्थेला राम राम ठोकावा लागणार होता. आणि हा कॅप्टन तर फ्लेमिंगला सोडायला तयार नव्हता. तेव्हा त्यानं फ्लेमिंगची अल्म्रॉथ राईट याच्याशी भेट घालून दिली. राईट हा प्रतिकारशक्ती आणि लस यांच्या संशोधनाचा प्रणेता होता. त्यानं फ्लेमिंगला आपल्या संस्थेत दाखल करुन घेतलं आणि फ्लेमिंग संशोधनाकडे वळला.

याच दरम्यान पहिलं महायुद्ध सुरु झालं. वैद्यकीय अधिकारी म्हणून फ्लेमिंगनं महायुद्धात भाग घेतला होता. या काळात त्यानं आपल्याबरोबर काम करणाऱ्या अनेक सैनिक मित्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यापैकी अनेक मृत्यू हे प्रत्यक्ष युद्धात झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे नव्हते तर ते युद्धातच झालेल्या पण लहान-मोठ्या जखमांमध्ये झालेल्या जंतुसंसर्गामुळे मरत होते. त्यावेळी हा जंतुसंसर्ग नियंत्रणाबाहेरचा होता. त्यावेळी अँटिसेप्टिक्स होती; पण त्यांचा तितकासा उपयोग नव्हता. त्यामुळे यावर काय करता येईल याबद्दल फ्लेमिंग विचार करत होताच. याचा अभ्यास करुन त्यानं एक शोधनिबंधही लिहिला होता. युद्धाच्या वेळी झालेल्या जखमांमध्ये काही जिवाणू खोलवर जातात आणि ते अँटिसेप्टिक्सना काहीही दाद देत नाहीत असं त्यानं आपल्या शोधनिबंधात म्हटलं होतं. त्याचा हा शोधनिबंध फार काही वाखाणला गेला नाही; पण तरी त्यानं आपलं संशोधन पुढे चालूच ठेवलं.

याच संशोधनादरम्यान १९२२ साली त्यानं लायसोझाइम नावाचं एक एन्झाइम शोधून काढलं. त्याचीही एक लहानशी गोष्टच आहे. फ्लेमिंगला स्वतःला जेव्हा सर्दी झालेली होती तेव्हा त्यानं आपल्या नाकातून वहाणाऱ्या द्रवाचा एक थेंब पेट्रीडिशमध्ये टाकला आणि ती पेट्रीडिश अशीच बाजूला ठेवून दिली. कामाच्या व्यापामध्ये तो ती पेट्रीडिश तब्बल पंधरा दिवस विसरूनच गेला होता. साधारणपणे अश्या पेट्रीडिशेसमध्ये काही काळानं वातावरणात असलेले अनेक सूक्ष्मजंतू वाढायला लागतात. पण फ्लेमिंगनं १५ दिवसांनी ही डिश पाहिल्यानंतर त्यात अपेक्षेप्रमाणे अनेक प्रकारच्या जिवाणूंची भरगच्च वाढ झाली होती; पण आश्चर्य म्हणजे त्या डिशमध्ये जिथे त्याच्या नाकातल्या पाण्याचा थेंब पडला होता ती जागा चक्क स्वच्छ राहीली होती ! तिथे कोणत्याही जिवाणूची वाढ झाली नव्हती. याचा अर्थ आपल्या नाकातल्या पाण्यामध्ये जंतूविरोधी काहीतरी असणार असा तर्क फ्लेमिंगनं लावला आणि या पदार्थाला त्यानं लायसोझाइम असं नाव दिलं. त्यानंतर हे लायसोझाइम आपल्या अश्रूंमध्ये, लाळेमध्ये, त्वचेमध्ये आणि केसांमध्येही असतं हे त्यानं शोधून काढलं. पण नंतर हे लायसोझाइम फारच थोड्या जंतूंविरोधी काम करतं असं त्याच्याच लक्षात आल्यावर यावर काहीतरी उपाय करायला हवा हे त्याच्या लक्षात आलं.

यानंतर त्यानं मग स्टॅफायलोकोकस प्रकारच्या भयानक संसर्गजन्य जिवाणूंवर अनेक प्रयोग करायला सुरुवात केली. या जंतूंना मारणारा पदार्थ त्याला काही केल्या मिळत नव्हता. एकदा प्रयोग करताना त्याच्या समोरची खिडकी उघडी होती आणि वाऱ्यानं खिडकीतून बुरशीचे काही कण त्या पेट्रीडिशवर येऊन बसले. आता ही पेट्रीडिश वाया गेली म्हणून त्यानं ती कचरा जमा करतो त्या भागात ठेवून दिली. त्यानंतर काही दिवस तो सहलीला जाऊन आला. सहलीहून आल्यावर पुन्हा कामाला लागण्याआधी कचरा साफ करावा म्हणून बाजूला ठेवून दिलेल्या पेट्रीडिशेस त्यानं समोर घेतल्या. त्यापैकी काही डिशेशमध्ये त्यानं स्टॅफायलोकोकस जिवाणूंची वाढ केली होती. तो सुटीवर जाण्याआधी या पेट्रीडिशेस सूर्यप्रकाशापासून लांब एका कोपऱ्यात पडून होत्या. त्या आवरताना त्यातल्या एका पेट्रीडिशकडे मात्र त्याचं लक्ष वेधलं गेलं आणि तो आश्चर्यचकीतच झाला. त्या डिशमध्ये चक्क सूर्य उगवल्यासारखं चित्र तयार झालं होतं ! कारण त्यात अनाहुतपणे वाढलेल्या बुरशीनं त्या पेट्रीडिशमध्ये मुद्दामहून वाढवलेले पिवळा ताप, न्यूमोनिया, डांग्या खोकला (डिप्थेरिया), गनोरिया, मॅनिंजायटिस असे भयानक रोग पसरवणारे जंतू चक्क मारुन टाकले होते ! तो दिवस होता २८ सप्टेंबर १९२७.

एक बुरशी चक्क अनेक भयानक रोग पसरवणाऱ्या जिवाणूंना मारून टाकते या विचारानंच फ्लेमिंग प्रचंड आश्चर्यचकित झाला होता. हा शोध लागला तेव्हा त्याला या बुरशीचं नावही माहीत नव्हतं. तोपर्यंत तो याला ‘मोल्ड ज्यूस’ असंच म्हणत होता. एका मित्रानं मग ही ‘पेनिसिलियम नोटॅटम’ नावाची बुरशी आहे असं सांगितल्यावर फ्लेमिंगनं या रसायनाचं नाव पेनिसिलिन असं ठेवलं. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे रसायन मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात वैज्ञानिकांना यश आलं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात लाखो सैनिकांचे प्राण वाचले, आणि फ्लेमिंगनं खरोखरच जग बदलवलं !

Scroll to Top