रुग्णांना लाफिंग गॅस देऊन अनेकांचे दात विनासायास उपटणाऱ्या डॉ. वेल्सला वाटलं की जोपर्यंत आपल्या संशोधनावर एखादा मान्यवर कौतुकाची मोहोर उमटवत नाही, तोपर्यंत आपल्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही. यासाठी त्याच्यापुढे बॉस्टनमधला सुप्रसिद्ध डॉक्टर जॉन वॉरेनचं नाव होतं. वॉरेनपर्यंत पोहोचण्यासाठी वेल्सनं आपला विद्यार्थी आणि आता सगळ्यांशी अतिशय धूर्तपणे गोडी गुलाबीचे संबंध ठेवणाऱ्या आणि दंतवैद्यकाचं काम करणाऱ्या विल्यम मॉर्टन याची मदत घ्यायचं ठरवलं. हीच त्याची अतिशय मोठी चूक ठरणार होती!
अनेक लफडी करणाऱ्या मॉर्टननं आपल्या प्रेमात पडलेल्या एका मुलीशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मॉर्टननं वैद्यकीय व्यवसाय सुरु केला तरच त्यांच्या लग्नाला परवानगी मिळेल अशी भूमिका तिच्या घरच्यांनी घेतली. म्हणून मॉर्टननं वेल्सकडून दंतवैद्यकशास्त्र शिकायला सुरुवात केली होती. मॉर्टननं आता वेल्सची गाठ वॉरेनशी घालून दिल्यावर वॉरेनच्या पाठिंब्याच्या जोरावर वेल्सनं लगेच 1845 साली बॉस्टनमध्ये मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये लाफिंगगॅसचं प्रात्यक्षिक आयोजित केलं. त्याला शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्यासाठी लाफिंगगॅसचा वापर करायचा होता. पण ऐन वेळी गडबड झाली. चुकून रुग्णाला कमी गॅस दिला गेल्यानं शस्त्रक्रियेच्या वेळी मध्येच उठून तो बोंबाबोंब करायला लागला. सगळ्या प्रेक्षकांनी वेल्सची टिंगल केली. यामुळे खिन्न होऊन वेल्सनं लाफिंगगॅसचा नादच सोडला आणि आपला दंतवैद्यकाचा व्यवसाय सोडून पुढची दोन वर्षं आंघोळीचे शॉवर्स आणि इतर घरगुती वस्तू विकत बसला!
हे सगळं विल्यम मॉर्टन थंड डोक्यानं बघत होता. लाफिंग गॅसऐवजी त्यानं इथर वापरून वेल्सच्या धर्तीवर प्रयोग सुरु केले. अखेर 1846 साली शस्त्रक्रियेमध्ये इथरचा वापर करायला तो सज्ज झाला. पण त्याआधी त्यानं बॉस्टनमधला सगळ्यात मोठा वैज्ञानिक चार्ल्स जॅक्सन याची मदत घ्यायचं ठरवलं. ही मॉर्टनच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरणार होती!
एखाद्या गोष्टीचा कुणी शोध लावला असं जाहीर झालं की जॅक्सन लगेच तो शोध आपणच लावला होता, असा वाद सुरु करे! 30 सप्टेंबर 1846 या दिवशी मॉर्टन आणि जॅक्सन भेटले. त्यांचं काय बोलणं झालं याविषयी दोघांचेही दावे वेगळे आहेत ! पण काहीही असो. तातडीनं त्याच रात्री मॉर्टननं इबेन फ्रॉस्ट नावाच्या मित्राचा दुखरा दात इथरच्या अंमलाखाली वेदना न होऊ देता काढला, आणि आपल्या यशाची खात्री असल्यामुळे या ‘ब्रेकिंग न्यूज’साठी त्यानं चक्क पत्रकारांनाही पाचारण केलं होतं. रातोरात मॉर्टन हीरो बनला. आता मॉर्टननं आणखी एक वाईट हेतू मनात बाळगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच आणखी एक प्रात्यक्षिक करायचं ठरवलं.
शस्त्रक्रिया नीट पार पडावी इतकाच मॉर्टनचा हेतू असता तर गोष्ट वेगळी. पण त्याच्या मनात कपट होतं. भुलेचा शोध लावायचं पेटंट मॉर्टनला आपल्याच नावावर करुन घ्यायचं होतं. त्यासाठी त्यानं एका वकिलाचा सल्ला मागितला. वकिलानं त्याला इथरमध्ये काही तरी मिसळून मग ते मिश्रण भूल देण्यासाठी वापरावं आणि त्याचं पेटंट घ्यावं असं सुचवलं. लगेच मॉर्टननं इथरमध्ये संत्र्याचा रस मिसळला, आणि त्याच्या वाफा हुंगण्याच्या प्रात्यक्षिकात गूढता आणण्यासाठी काही कारागिरांकडून रात्रभर काम करवून घेऊन एक उपकरणही बनवून घेतलं. त्यामुळे त्याला प्रात्यक्षिक सुरु करायला 25 मिनिटं उशीर झाला ! बेचैन प्रेक्षकांना वॉरेननं कसंबसं थोपवून धरलं होतं. मॉर्टन व्यासपीठावर येताच त्यानं आपल्या जादूमय उपकरणातून येणाऱ्या वाफा प्रयोगात भाग घेणाऱ्या रुग्णाला हुंगायला दिल्या. काही मिनिटांतच रुग्ण बेशुद्ध पडला आणि वॉरेननं रुग्णाला वेदना न जाणवू देता मानेवरची गाठ काढायची शस्त्रक्रिया यशस्वी केली. यातच मॉर्टननं इतिहास घडवला होता !
आपल्या शोधाचं श्रेय मॉर्टन घेतोय हे बघून वेल्स संतापला. त्यानं आता भूलेसाठी क्लोरोफॉर्म वापरायचे प्रयोग केले, पण हे करताना त्याला स्वत:लाच क्लोरोफॉर्म हुंगायची सवय लागली. त्याची आणखीनच छी थू झाली. नशेत असताना त्यानं एकदा एका वेश्येच्या अंगावर सल्फ्युरिक अॅसिडचे थेंब उडवले. त्यामुळे त्याला तुरुंगवासही झाला. वेल्सनं बरीच पत्रं लिहून आपणच भूल द्यायच्या पद्धतीचा शोध लावला असल्याचा दावा केला. पण व्यर्थ ! शेवटी त्याचा नर्व्हस ब्रेकडाऊन होऊन 1848 साली त्यानं तुरुंगात असतानाच क्लोरोफॉर्मच्या अंमलाखाली आपल्या पायाची नस कापून घेऊन आत्महत्या केली.
इकडे मॉर्टनला भूलेच्या औषधाचं पेटंट मिळालं खरं, पण त्या औषधाला इतकी मागणी होती की पेटंट वगैरे सगळं धाब्यावर बसवून सगळे सर्रास इथर आणि इतर पदार्थ भूलेसाठी वापरायला लागले. मॉर्टननं अनेक जणांना पैसे चारुन, जाहिराती देऊन, आपल्या बाजूनं लेख लिहिण्यासाठी लाच देऊन इतिहासात आपलं नाव अमर करायचे वारेमाप प्रयत्न केले. पण 1868 सालच्या जून महिन्यात ‘यामागचं खरं श्रेय जॅक्सनला मिळालं पाहिजे, आणि मॉर्टन हा अतिशय भुक्कड माणूस आहे’ असा चार पानी लेख छापून आल्यावर मॉर्टनचा रागानं तीळपापड झाला. या सगळ्यानं त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. आपली बाजू मांडण्यासाठी तो न्यूयॉर्कमध्ये गेला. रात्री बग्गीतून एका हॉटेलात जेवायला जात असताना त्यानं अचानक उडी मारुन आपलं डोकं एका पाण्यानं भरलेल्या तळ्यात बुडवलं ! त्याला तिथून बाहेर काढून रुग्णालयात नेतानाच त्याचा वयाच्या 48व्या वर्षी मृत्यू झाला.
वेल्स आणि मॉर्टन यांच्या झुंजीत भर पडली ती जॅक्सनची. मॉर्टनला मिळालेलं पेटंट रद्द होऊन ते आपल्या नावावर व्हावं यासाठी जॅक्सननं जंग जंग पछाडलं ! त्यातून जॅक्सन आणि मॉर्टन यांना भूलेच्या शोधाविषयीचं श्रेय वाटून दिलं जावं असा तोडगा निघाला. त्यांना अर्थातच तो मान्य नव्हता. त्यात वेल्सही होताच. या तिघांचे एकमेकांवर कुरघोडी करायचे प्रकार सुरुच होते ! 1848 साली वेल्स वारला आणि 1868 साली मॉर्टन वारला, तरीही जॅक्सन गप्प बसायला तयार नव्हता. 1873 साली त्याला मेंदूचा झटका आला आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. तो कुणालाही आपल्या जवळ येऊ द्यायचा नाही! शेवटी त्याला पकडून एका वेड्यांच्या इस्पितळात 7 वर्षं ठेवण्यात आलं ! तिथेच त्याचा शेवट झाला.
भुलेच्या औषधाच्या शोधामुळे कोट्यवधी लोकांवर अक्षरश: उपकार झाले आहेत. असह्य वेदनांमधून या संशोधनानं अख्ख्या मानवजातीची सुटका केली आहे. पण काळाचा महिमा बघा! पूर्ण मानवजातीचं दुखणं कायमचं संपवणाऱ्या या संशोधनानं त्याच्या निर्मितीनाट्यामधल्या वेल्स, मॉर्टन आणि जॅक्सन यांना मात्र फक्त दु:ख आणि वेदनाच दिल्या !