भाग – ०६ व्हेसॅलियस

माणसाचा मृतदेह बघून कधी कुणाला आनंद होईल का? पण असा आनंद होणारा अँड्रियस व्हेसॅलियस (1514-1564) या नावाचा एक अजब माणूस खरंच होऊन गेला ! वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व्हेसॅलियसनं आपल्या वयाच्या 18व्या वर्षी ब्रसेल्स हे आपलं जन्मगाव सोडलं आणि पॅरिस गाठलं. तिथं त्याला शिकवायला सिल्व्हियस नावाचा गेलन या महान डॉक्टरचा शिष्य होता. सिल्व्हियसचा अर्थातच गेलनच्या तत्वांवर प्रचंड विश्वास होता. गेलननं म्हणून ठेवलेली प्रत्येक गोष्ट तो ब्रीदवाक्य मानायचा. पण हे सगळं व्हेसॅलियसला पटायचं नाही. त्याला स्वतःच माणसाच्या शरीराचं विच्छेदनच करुन बघायचं होतं.

त्याकाळी त्याला शरीरविच्छेदनाची संधी मिळणं अशक्यच होतं. त्याकाळचा धार्मिक विचारांचा पगडा बघता असं करायच्या प्रयत्नात त्यालाच जाळलं किंवा फासाला लटकावलं गेलं असतं ! जास्तीत जास्त म्हणजे स्मशानात माणसाच्या शरीराच्या कुठून तरी मिळालेल्या अवशेषांमधून उरलेली हाडं व्हेसॅलियसला तपासायला मिळायची, एवढंच! व्हेसॅलियस मग सदोदित या हाडांच्या मागावर असायचा ! स्मशानं हीच त्याची प्रयोगशाळा आणि अभ्यासिकाही बनली ! एकदा त्याला पॅरिस शहरात एक प्रेत दिसलं. गिधाडांनी त्याचे लचके तोडलेले असले तरी त्या प्रेतातली हाडं आणि त्या हाडांलगतचे स्नायू अजून शिल्लक होते. ते बघताच व्हेसॅलियसला हर्षवायूच झाला ! माणसाच्या शरीराचा सांगाडा मिळायची संधी त्यांच्यासमोर चालून आली होती. पण तेव्हा दुपारचं लख्ख ऊन होतं. साहजिकच त्यानं जर हे प्रेत घेऊन जायचा प्रयत्न केला असता तर त्याला कुणीतरी बघायची दाट शक्यता होती. त्यामुळे घाईघाईत त्यानं त्या प्रेताच्या सांगाड्याचा काही भाग काढून घेतला आणि रात्री पुन्हा तिथे येऊन त्यानं त्या प्रेतातला मेंदू काढून घेतला.

नंतर व्हेसॅलियसनं त्या प्रेताच्या सांगाड्यामधली सगळी हाडं माणसाच्या शरीरात असतात तशी रचून ठेवली. त्याला हे जमायचं; कारण माणसाच्या शरीराचा आणि त्यातल्या हाडांचा व्हेसॅलियसनं इतका दणदणीत अभ्यास केला होता की कुठलंही हाड तो नुसत्या स्पर्शावरुन ओळखू शके! व्हेसॅलिसयनं अॅनॅटॉमीचा अभ्यास करण्यासाठी अश्या प्रकारे अनेक मृत शरीरांची चक्कं चोरी केली होती !

मृत शरीरं मिळवण्यासाठी त्याला अनेक क्लृप्त्या कराव्या लागायच्या. कधी तो प्रेताचं थडगंच उकरुन काढायचा, तर कधी कैद्यांना फाशी देऊन सार्वजनिक ठिकाणी लोकांना पहायला ठेवलं असेल, तर ती प्रेतं तो चोरुन न्यायचा, तर कधी कुणाच्या अंत्यविधीलाच हा हजर असायचा ! अंत्यविधी करुन सगळे लोक आपापल्या घरी गेले की तो मृत शरीर पुरलेलं थडगं बाहेर काढून त्यातून मृत शरीरच घेऊन जायचा ! असे उद्योग करुन मिळवलेली मृत शरीरं मग त्याला आपल्या घरात लपवून ठेवावी लागत होती. आणि मग रात्री मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तो त्या मृत शरीरांचं विच्छेदन करत बसे. कारण अर्थातच त्या काळी माणसाच्या शरीराचं शवविच्छेदन करायला परवानगी नव्हती. पण आपल्या शरीराच्या आतल्या अवयवांची रचना कशी असते आणि आपलं शरीर कसं काम करतं याचा शोध घेण्याची त्याची जिद्द अफाट होती. आपल्या शरीराचं गूढ उकलण्यासाठी तो कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकत होता. या जिद्दीमुळेच त्यावेळेपर्यंत कोणालाही माहीत नाही अश्या गोष्टींची उकल त्यानं या उद्योगांतून केली होती.

१५३६ मध्ये व्हेसॅलियसला पडुआ भागातल्या विद्यापीठात शरीरशास्त्र शिकवण्यासाठी आमंत्रण आलं. पुढची पाच वर्षं त्यानं तिथे शिकवण्याचं काम केलं. यादरम्यान व्हेसॅलियसनं मानवी अनॅटॉमिवर एक मोठं पुस्तक लिहायचं ठरवलं. आणि तो या कामाला लागला.

१५३९ साली एका न्यायाधीशाला व्हेसॅलियसचं काम आवडलं आणि त्यानं देहदंडाच्या शिक्षेनंतर मृत झालेल्या आरोपींची प्रेतं व्हेसॅलियसला शरीरविच्छेदनासाठी मिळावीत अशी व्यवस्था केली. व्हेसॅलियसला तिथे इतका मान होता की एखाद्या कैद्याला कधी मारायचं हे व्हेसायलियसच्या मृत शरीराच्या गरजेरुन ठरायचं ! त्यानंतर काही लोक आपण मेल्यानंतर आपल्या शरीराचं विच्छेदन व्हेसॅलियसकडून व्हावं अशी स्वत:हून इच्छा प्रदर्शित करायचे. यातून अनॅटॉमीचा अभ्यास करणं अजून सोपं झालं. त्यामुळे व्हेसॅलियसच्या लिखाणाची आणि आकृत्यांची अचूकता आणखी वाढली.

यातून १५४१ साली व्हेसॅलियसनं आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका लक्षात आणून दिल्या आणि अनेक गैरसमजांवर तोफा डागल्या. अॅरिस्टॉटल, गेलन आणि ‘माँडिनो द लियुझ्झी’ यांनी माणसाच्या हृदयाविषयी अनेक विधानं केली होती. ती साफ चूक असल्याचं व्हेसॅलियसनं दाखवून दिलं. उदाहरणार्थ माणसाच्या हृदयाला तीन नसून चार कप्पे असतात आणि माणसाच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचा उगम यकृतात होत नसून हृदयात होतो हेही व्हेसॅलियसनं प्रथमच सिद्ध केलं. १५४३ साली त्यानं ‘जेकब करेर वॉन गेबवायलर’ नावाच्या एका कुप्रसिद्ध माणसाच्या प्रेताचं जाहीररित्या शरीरविच्छेदन केलं. त्यातून त्यानं आपल्या वेगवेगळ्या संकल्पनांचं जाहीर प्रात्यक्षिकच दिलं. त्या काळी असं माणसाच्या शरीराचं जाहिर विच्छेदन करणं हे निशिद्ध होतंच पण त्यातून गेलन वगैरे लोकांच्या चुका दाखवणं हा तर खूप मोठा गुन्हाच होता. हे धाडस व्हेसॅलियसनं केलं.

संशोधन आणि प्राध्यापकी करत असतानाच त्यानं १५४३ साली ‘द ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका’ (‘माणसाच्या शरीराची रचना’) हा नितांतसुंदर ग्रंथ प्रकाशित केला. त्यात त्यानं अतिशय अचूक चित्रंही काढली होती. त्यात आपल्या पचनसंस्थेचं आणि शरीरातल्या अंतर्गत अवयवांचं इतकं अचूक वर्णन केलं आहे की तोपर्यंत कुणालाच याविषयी इतकी सखोल माहिती नव्हती !

१५६४ साली एका शरीराचं विच्छेदन करत असताना त्या शरीरातलं हृदय अजून सुरुच असल्याचं व्हेसॅलियसच्या लक्षात आलं ! म्हणजे व्हेसॅलियस जिवंत माणसाचं विच्छेदन करत होता ! यामुळे मानसिक धक्का बसून व्हेसॅलियस धार्मिक यात्रेला निघून गेला असंही म्हटलं जातं. त्यावेळी जेरुसलेमला पोहोचल्यावर त्याला एक निरोप मिळाला. त्याचा मित्र आणि शिष्य फॅलोपियस याच्या मृत्यूमुळे पडुआ विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकवायला आता कोणीच उरलं नव्हतं. ही जागा व्हेसॅलियसनं घ्यावी अशी विनंती त्याला करण्यात आलेली होती. व्हेसॅलियसनं ती विनंती स्वीकारली, पण परत जात असताना समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी त्याची तब्येत पार खच्ची करुन टाकली. हे इतक्या वेगानं घडलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला ! त्यावेळी व्हेसॅलियस इतका कफल्लक होता की एका माणसाला दया येऊन त्यानं व्हेसॅलियसच्या अंत्यविधीची व्यवस्था केली.

एकूणच शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र पुढे नेण्यात व्हेसॅलियसचा खूपच मोठा हात होता यात शंकाच नाही ! पण मृत्यू होण्यापूर्वी व्हेसॅलियसनं माणसाच्या शरीराविषयी प्रचंड ज्ञान मागे ठेवलं होतं.

Scroll to Top