वैद्यकशास्त्राचा इतिहास भयावह कथांनी भरलेला आहे. रेबीज किंवा हायड्रोफोबिया या आजाराचंच उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत या आजारामुळे १००% लोक मृत्यूमुखी पडत होते.
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला काही दिवसांत कणकण येणं, भूक न लागणं, डोकेदुखी, मुंग्या येणं अशी लक्षणं दिसायला लगायची. त्यानंतर त्याला चाव्याच्या ठिकाणी वेदना व्हायला लागायच्या. यानंतर तो अस्वस्थ होणं, एका जागी ठरेनासं होणं आणि कुत्र्यासारखं चक्क उड्या मारणं असं सुरु व्हायचं. शेवटी हायड्रोफोबियाचं नेमकं लक्षण असलेली अन्न-पाणी गिळण्याची त्याला भीती वाटायला लागायची. खूप तहान लागल्यावर पाणीच काय दारू सुद्धा प्यायचा प्रयत्न केला तरी त्याला कोणीतरी आपला गळा आवळतंय असं वाटायला लागायचं. यात त्याचा श्वासही गुदमरायचा, स्वरयंत्र, घसा आणि छाती हेही दुखायला लागायचे. त्यानंतर त्याला जास्तच अस्वस्थ वाटायला लागायचं.
आजार वाढत गेल्यानंतर तर रोग्याला पाणी दिसलं किंवा कुठेतरी पाणी गळण्याचा किंवा वहाण्याच्या आवाज आला तरी त्याला गळा दाबला गेल्याची लक्षणं दिसायला लागायची. यानंतर रुग्ण इतरांनाही चावायचा प्रयत्न करणं आणि थुंकणं असं करायला लागत. शेवटी त्याला फीट्स येऊन पॅरेलिसिस होत असे. ही लक्षणं दिसायला लागल्यापासून चारच तासात रुग्ण कोमात जाऊन मृत्यूमुखी पडत असत.
यावरची लस मात्र १८८५मध्ये लुई पाश्चर यानं शोधून काढली. लुई पाश्चर लहान असताना शाळेतून परतताना एका माणसाला लोहाराच्या भट्टीसमोरच तापलेल्या सळईचा चटका देण्याचा प्रसंग त्यानं पाहिला होता. आपल्या वडिलांना विचारल्यानंतर, ‘‘त्या माणसाला पिसाळलेलं कुत्रं चावलं आहे; असा चटका दिला नाही तर तो माणूसही पिसाळून काहीच दिवसात मरेल, म्हणून असा चटका देणं गरजेचं आहे.’’ असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासून लुई पाश्चरच्या मनात तो प्रसंग कोरला गेला होता.
अनेक क्षेत्रांत संशोधन केल्यानंतर वयाची पन्नाशी उलटून गेल्यानंतर त्यानं रेबीजवर लस शोधण्यासाठी आपलं लक्ष केंदित केलं. पाश्चरनं यासाठी अनेक प्रयोग केले; अनेक प्राण्यांच्या लाळेचे नमुने त्यानं मायक्रोस्कोपखाली तपासले पण त्याला रेबीजचा जंतू काही दिसला नाही. कसा दिसणार ? कारण रेबीजचा विषाणू साध्या मायक्रोस्कोपखाली दिसत नाहीत. पण तरीही त्यानं आपले प्रयोग थांबवले नाहीत.
या प्रयोगांदरम्यान पाश्चरचे नोकर पिसाळलेल्या कुत्र्याचा जबडा दोन्ही बाजूंनी फाकवून धरायचे, आणि पाश्चर त्या कुत्र्याच्या तोंडात काचेची नळी खुपसायचा. त्यात त्या कुत्र्याची लाळ जमा व्हायची. हे अतिशय धाडसी आणि धोकादायक काम असलं तरी पाश्चर अतिशय निश्चयी स्वभावानं ते करायचाच. कुत्री का पिसाळतात आणि पिसाळलेली कुत्री चावली की माणसं किंवा इतर प्राणी का पिसाळतात हे त्याला शोधायचं होतं. त्यासाठी कुत्र्याच्या लाळेत काही सूक्ष्मजीव दिसतात का हे त्याला बघायचं होतं.
पाश्चरनं काही दिवसांनी एका पिसाळलेल्या कुत्र्याला निरोगी असलेल्या कुत्र्यांच्या एका पिंजऱ्यात ठेवलं गेलं. पिसाळलेल्या कुत्र्यानं चार निरोगी कुत्र्यांना चावे घेतले, आणि त्यातल्या दोन कुत्र्यांना रेबीजची लागण झाल्यामुळे तेसुद्धा पिसाळल्याचं सहा आठवड्यांनी लक्षात आलं. पण गंमत म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेऊनसुद्धा इतर दोन कुत्री मात्र अजून ठीकठाकच होती! हे गौडबंगाल काय आहे याचा विचार करताना पिसाळणं ही प्रक्रिया मेंदूशी संबंधित असावी असं पाश्चरला वाटलं.
त्यामुळे जेव्हा पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ निरोगी प्राण्यांच्या शरीरात टोचली जाते तेव्हा कदाचित मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे सूक्ष्मजीव मरुन जात असावेत आणि त्यामुळे ते प्राणी धडधाकटच राहत असावेत असं पाश्चरला वाटलं. पण कुठल्याही प्राण्याच्या मेंदूत पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ कशी टोचायची हे त्याला माहीत नव्हतं. रॉक्स नावाच्या त्याच्या एका सहाय्यकानं त्याला एका कुत्र्याच्या डोक्याला भोक पाडून त्यात आपण ही लाळ टोचूयात अशी ‘युक्ती’ सुचवताच पाश्चर त्याच्यावर भडकला, आणि त्याच्या बिनडोकपणाबद्दल त्यानं रॉक्सची चांगलीच कानउघाडणी केली. पण एकदा रॉक्सनं पाश्चरचं लक्ष चुकवून एका निरोगी कुत्र्याला भुलेच्या औषधानं बेशुद्ध केलं, आणि मग त्याच्या कवटीला एक छिद्र पाडून त्याच्या मेंदूत रेबीज होऊन मेलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातली लाळ टोचली! सुरुवातीला पाश्चर त्याच्यावर वैतागला, पण दोन आठवड्यांमध्ये तो कुत्रा खरंच पिसाळून मेला!
हे सारं गूढ कसं सोडवायचं या पेचात अडकलेल्या पाश्चरला एके दिवशी एकदम वेगळंच काही तरी घडताना दिसलं. रेबीज झालेल्या एका सशाची लाळ त्यांनी एका निरोगी कुत्र्याच्या मेंदूत टोचली तेव्हा तो कुत्रा अपेक्षेप्रमाणे झटके द्यायला लागला आणि तो पिसाळल्याची सगळी लक्षणं दिसायला लागली. इतर अनेक प्राण्यांसारखा तोसुद्धा मरणार अशी सगळी चिन्हं दिसत असतानाच अचानकपणे तो कुत्रा बरा व्हायला लागला! काही दिवसांनी त्याची पिसाळल्याची सगळी लक्षणंही पूर्णपणे नाहीशी झाली, आणि तो एकदम धडधाकट झाला. कुतुहलापोटी पाश्चरनं आता त्या कुत्र्याच्या मेंदूत पुन्हा एकदा आधी पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातली लाळ टोचली, आणि काय आश्चर्य? या कुत्र्यावर या लाळेचा काहीएक परिणाम झाला नाही! त्याला रेबीज झालाच नाही. म्हणजेच जर एखाद्या प्राण्याला रेबीज होऊन त्यातून तो काही कारणानं बरा झाला तर त्याला पुन्हा रेबीज होत नाही असं पाश्चरच्या लक्षात आलं. याचाच अर्थ त्या प्राण्याच्या शरीरात रेबीजविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते.
मग पाश्चरनं रेबीजमुळे मेलेल्या सशाच्या पाठीच्या कण्याचा एक तुकडा कापून चौदा दिवस एका निर्जंतुक केलेल्या बाटलीत ठेवला. नंतर त्यानं त्याचे बारीक कण काही निरोगी कुत्र्यांच्या मेंदूंत टोचले, तर त्या कुत्र्यांना अजिबात काही इजा झाली नाही. नंतर त्यानं दोन कुत्र्यांना चौदा दिवसांपूर्वीचा, मग तेरा दिवसांपूर्वीचा, मग बारा दिवसांपूर्वीचा, असं करत करत अगदी ‘ताजा’ नमुना टोचला. तसंच आणखी दोन कुत्र्यांना त्यानं आधीच्या सगळ्या पायऱ्या वगळून पिसाळलेल्या कुत्र्याची फक्त एकदम ताजी लाळ टोचली. एका महिन्यानंतर ज्या दोन कुत्र्यांना पाश्चरनं दररोज वाढत गेलेल्या ताकदीचे लाळीचे डोस दिले होते ती एकदम टुणटुणीत होती, पण ज्या दोन कुत्र्यांना त्यानं एकदम शेवटी एकदाच पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ टोचली होती ती दोन्ही कुत्री मेली होती! पाश्चरनं रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंवर मात करण्याचा मार्ग शोधून काढला होता! विषाणूंविरुद्धच्या लसीचा एक वेगळाच प्रकार शोधून काढला होता.