1840 सालाच्या अगोदर चक्क माणसांचे हातपाय बांधून शस्त्रक्रिया केल्या जात. त्यावेळी रुग्ण गुरासारखा ओरडे; कित्येकदा तो मरेही. किंबहुना शस्त्रक्रियांमध्ये होणाऱ्या वेदनाच इतक्या भयानक असायच्या की रुग्ण शस्त्रक्रिया न करुन घेता झालेल्या संसर्गामुळे किंवा आजारामुळे मरायचा मार्ग अनेकदा पत्करे! पूर्वीपासून वेदना कमी करण्यासाठी उपाय नव्हतेच असं नाही. मँड्रेक्स नावाची वनस्पती, अफू, कोकेन, मॉर्फिन वगैरेंचेही थोडेफार प्रयोग झाले होते.
1775 साली जोसेफ प्रीस्टलेनं ‘नायट्रस ऑक्साईड’ या वायूचा शोध लावला असला तरी त्याचा रुग्णाला बेशुद्ध पाडून शस्त्रक्रिया करण्यासाठी वापर होऊ शकेल हे सांगणारा सर हंफ्रे डेव्ही (1778-1829) हा पहिलाच होता. लहानपणी डेव्हीनं एका औषधाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. पण तिथेही कुठल्याशा रसायनांवर प्रयोग करुन तो स्फोट घडवून आणायचा. त्यामुळे तिथून त्याची हकालपट्टी झाली. त्याला अनेक गोष्टींमध्ये रस होता. त्यामुळेच वर्डस्वर्थ आणि कोलेरिज यांच्याबरोबर त्याची पुढे मैत्री झाली. महत्त्वाकांक्षी डेव्हीनं फ्रेंच शिकून 1797 साली लेव्हायजेचं पुस्तक वाचलं आणि तो रसायनशास्त्राकडे वळला. बेडॉस या जोसेफ ब्लॅकच्या शिष्याच्या ‘न्यूमॅटिक इन्स्टिट्यूट’मध्ये मदतनीस म्हणून काम करत असताना त्यानं 1799 साली भूल देण्यासाठी ‘नायट्रस ऑक्साईड’चा वापर करायची युक्ती सुचली.
डेव्ही या वायूचे स्वत:वरच प्रयोग करायचा. पूर्ण छातीभर नायट्रस ऑक्साईड वायू भरून घेतल्यावर हसू आवरत नाही हे लक्षात आल्यावर त्याला ‘लाफिंग गॅस’ असं नाव पडलं. याचा उपयोग शस्त्रक्रियेच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी होईल असं डेव्हीनं लिहून ठेवलं होतं. पण त्याकडे कुणी लक्षच दिलं नाही. कारण त्याचा करमणुकीसाठीच वापर करण्यातच मंडळी गर्क होती. त्या काळी इंग्लंडच्या थिएटर्समध्ये सिनेमासारखेच 3 ते 5 आणि 6 ते 8 असे चक्क लाफिंग गॅसचे शोज् चालायचे. पहिला ‘शो’ संपल्यावर बाहेर तिकीटं काढून ताटकळत उभी असणारी मंडळी लगेच आत घुसायची ! मंडळी थिएटरमध्ये गेल्यावर हॉलमध्ये ‘लाफिंग गॅस’ सोडला जायचा. मग सगळी मंडळी विचित्र हातवारे करत नाचायला लागायची. काही जण तर आक्रमक होऊन फर्निचरची नासधूस करत. मग त्यांना आवरायला थिएटरचालक चक्क गुंड पाळायचे.
त्या काळी लाफिंग गॅस घेणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाई. त्याच्या पार्टया होत. जेवणाअगोदर दारुऐवजी लाफिंग गॅस घ्यायची पद्धत सुरु झाली होती. भरपूर हसल्यानंतर जेवण असायचं. स्वत: डेव्ही अशा पार्ट्या द्यायचा. त्यांना कित्येक सेलिब्रिटीज् यायचे. सॅम्युएल टेकर कोलेरिज, रॉबर्ट साऊथे, पीटर रॉजेट, विल्यम वर्डस्वर्थ असे अनेक जण त्यात हजेरी लावायचे.
अमेरिकेत इथरचा वापर भूलेसाठी करणारा डॉक्टर म्हणून जॉर्जिया राज्यातल्या क्रॉफर्ड लाँग (1815-1878) याचंही नाव घेता येईल. त्याच्या काही तरुण मित्रमंडळींनी त्याला नायट्रस ऑक्साईड मागितलं, तर त्यानं त्याऐवजी त्यांना इथर दिलं. झालं ! त्यांच्या मग इथरच्या पार्ट्या सुरु झाल्या ! इथर हुंगल्यावर तो आणि त्याचे मित्र झिंगायचे, आणि त्याच नशेत कुठे कुठे धडकायचे. त्यात त्यांना जखमाही व्हायच्या. पण इथरचा अंमल उतरेपर्यंत या सगळ्याचं त्यांना काहीही सोयरसूतक नसे ! मग जेम्स व्हेनेबल नावाच्या लाँगच्या एका मित्रानं त्याला इथरच्या अंमलाखाली त्याच्या मानेतली एक गाठ काढायची शस्त्रक्रिया करायची विनंती केली. 30 मार्च 1842 या दिवशी मग लाँगनं एका टॉवेलवर इथर ओतून त्यातून निघणाऱ्या दर्पयुक्त वाफा व्हेनेबलला तो बेशुद्ध पडेपर्यंत हुंगायला दिल्या. मग त्यानं व्हेनेबलच्या मानेवरची गाठ काढून टाकली तेव्हा त्याला काही समजलंसुद्धा नाही ! यामुळे अतिशय खूष झालेल्या लाँगनं अनेक शस्त्रक्रियांमध्ये इथरचा वापर केला. पण गंमत म्हणजे त्यानं आपला हा शोध पुढची 7 वर्षं आपल्याजवळच ठेवला ! 1849 साली त्यानं एका वैद्यकीय नियतकालिकात याविषयीची माहिती लिहिली. बहुतेक त्याला त्या काळातल्या अंधश्रद्धाळु लोकांनी आपल्यावर कसला तरी ठपका ठेऊन अडचणीत आणायची भीती वाटत असावी! अन्यथा कदाचित इतिहासात भूल देण्याचं तंत्रज्ञान शोधणारा म्हणून इतर सगळ्यांऐवजी लाँगचं नाव लिहिलं गेलं असतं!
10 डिसेंबर 1844 या दिवशी अमेरिकेतल्या लाफिंग गॅसच्या गार्डनर कोल्टनच्या एका प्रात्यक्षिकाच्या वेळी होरेस वेल्स (1815-1848) नावाचा दातांचा डॉक्टर हजर होता. सॅम्यूएल कूली नावाचा एक मनुष्य हा वायू हुंगून जेव्हा सगळ्याची नासधूस करत होता तेव्हा सगळे बघे टाळ्या पिटत होते. जखमांनी रक्तबंबाळ झाला असला तरी कूली मात्र हरणासारखी पळापळ करतच होता, हे वेल्सच्या लक्षात आलं. वेल्सची लगेच ट्यूब पेटली. याचा उपयोग दात उपटताना भूल देण्यासाठी करता येईल असं त्याला वाटलं. दुसऱ्याच दिवशी वेल्सनं स्वत: लाफिंग गॅस घेऊन स्वत:चा दुखरा दात दुसऱ्या दंतवैद्याकडून उपटवून घेतला. यावेळी त्याला काहीच वेदना जाणवल्या नाहीत ! खरं म्हणजे वेल्सनं लाफिंग गॅसचा भूलेसाठी यशस्वीरित्या प्रयोग केल्यावर दुसरं कुणी त्याच्या शोधाचं श्रेय घ्यायला पुढे यायचं काही कारणंच नव्हतं.
पण तसं होणार नव्हतं. या नाट्यात वेल्स नावाचा दंतवैद्यक होताच. पण त्याचबरोबर मॉर्टन, जॅक्सन आणि डॉक्टर लाँग हेही लोक होते. या सगळ्यांमध्ये मग पुन्हा प्रचंड मारामाऱ्या झाल्या. शेवटी हे प्रकरण अमेरिकन काँग्रेसकडे गेलं. शेवटी 1864 साली अमेरिकन डेंटल असोसिएशननं वेल्सला ईथरचा संशोधक म्हणून मरणोत्तर गौरव केला. मॉर्टनला पुढे लोकांनी खूपच विरोध केला. त्यानंही हे सगळं सोडून शेती करायला सुरुवात केली. त्याला जॅक्सनवर खटला भरायचा होता. शेवटी सेंट्रल पार्कमध्ये मॉर्टनचा शेवट विचित्रच झाला. जॅक्सनला मग वेड लागलं. 1880 साली तो वेड्यांच्या इस्पितळात मरण पावला ! पण या सगळ्या नाट्याची सुरुवात हंफ्रे डेव्हीपासून अनेक दशकांपूर्वी झाली होती. भूल देण्याच्या शोधांच्या चित्तथरारक नाट्यामध्ये बरीच भांडणं, खटले, आत्महत्या, नैराश्य, मृत्यू अशा अनेक गोष्टी आहेत ! त्या पुढच्या भागात पाहू !